सिंधुदुर्ग today
कवी सुरेश बिले यांची कविता म्हणजे माणुसकीचा आग्रह
बोल अंतरीचे' काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
कार्यक्रमाला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती
कणकवली/प्रतिनिधी
कवी सुरेश बिले हे सांस्कृतिक क्षेत्रातील प्रामाणिक कार्यकर्ते. त्यांच्या 'बोल अंतरीचे ' या काव्यसंग्रहातील कविता वाचताना त्यांच्या प्रांजळ स्वभावाचे दर्शन घडते.'बोल अंतरीचे ' मधील कविता माणुसकीचा आग्रह धरत असून माणसामाणसातील संवाद वाढत जावा असे आवाहनही करते असे प्रतिपादन नामवंत कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले.
कवी सुरेश बिले यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या :बोल अंतरीचे' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कवी कांडर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर, प्रसिद्ध कवयित्री प्रमिता तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना कांडर यांनी साधी सरळ अवतरणारी 'बोल अंतरीचे' मधील कविता सामान्य माणसांच्या सुखदुःखाविषयी बोलते तेव्हा या कवितेचा आवाज तीव्र होतो आणि उपेक्षित वर्गाला न्याय मिळायला पाहिजे असा आग्रहही ही कविता धरते असेही सांगितले. यावेळी कवी सुरेश बिले यांच्यासह राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलीफे हिंदुस्थान पेट्रोलियमचे निवृत्त महाव्यवस्थापक दत्तात्रय तवटे आदी उपस्थित होते.
श्री मातोंडकर म्हणाले, बिले यांची कविता माणसाला जपण्याची भाषा बोलते.माणसाच्या दुःखाची कणव या कवितेत ठायी ठायी दिसते. स्वतःपुरते न पहाता समाजाच्या यातना समजून घेण्यासाठी समाजाच्या अंतरंगी थोडं डोकावून पहा. आयुष्यात स्वतः फुलत असताना इतरांच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण जपूया अशीही भावना बिले यांनी आपल्या कवितेत व्यक्त केली आहे.कवयित्री तांबे म्हणाल्या की, शोषितांच्या आधाराला शब्दांचेच नारे' अशा आशयाची बिले यांची कविता असून यावरून त्यांचा संपूर्ण काव्यसंग्रह कसा असेल याची आपल्याला कल्पना येते.
माझी मायबोली या कवितेतून मालवणी भाषेची थोरवी वर्णितांना त्यांचा उर अभिमानाने फुलून येतो.आयुष्य कसं जगायचं हे देखील ही कविता शिकवते.वाचकाला वेळोवेळी धीराचे दोन शब्दही द्यायला कवी विसरत नाही.बिले यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयीन जीवन, पत्रकारिता आणि परिवहन महामंडळातील नोकरीचा कालावधी तसेच आपले सांस्कृतिक काम, काव्यलेखन याविषयी वाटचाल कथन केली.
ॲड. हुस्नबानू खलीफे, दत्तात्रय तवटे यांनीही बिले यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी ॲड. हुस्नबानू खलीफे,तसेच बिले यांचे मित्रमंडळ यांनी बिले यांचा विशेष सत्कार केला. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.यावेळी ॲड.विलास परब, लेखक संजय तांबे, साहित्यिक सुरेश ठाकूर, सी. ए. मोहन पाताडे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे महेंद्र कदम, नगर वाचनालय कणकवलीचे श्री.तानावडे, प्रा.चिकोडी, वास्तूविशारद सुर्यकांत बिले, राजेंद्र म्हापसेकर, मंगेश सावंत, बाबू मुरकर, बाळकृष्ण कांबळे, सुभाष राणे, दादा परब, हरी गायकवाड, अक्षय वर्दम, रुपेश तायशेटे, शामसुंदर वर्दम आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा