सिंधुदुर्ग today
कणकवली तालुक्यात गणेशोत्सव काळात विजेचा खेळखंडोबा थांबवा..
वीज ग्राहकांना वेळेत विज बिलांचे वाटप न केल्यास होळी करणार ; कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेने कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची घेतली भेट
कणकवली दि.२ सप्टेंबर
कणकवली तालुक्यात असलेल्या वीज समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील काही कामे प्रलंबित आहेत. वीज ग्राहकांना वीज बिले वेळेत मिळत नसल्यामुळे विनाकारण भुर्दंड पडत आहे.नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत वीजबिले तारीख संपत असलेल्या कालावधीत वाटप केली जातात. पुढील महिन्यात याबाबत सुधारणा न झाल्यास वीज बिलांची होळी करण्याचा इशारा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने देण्यात आला. दरम्यान वीज समस्या व प्रलंबित कामात संदर्भात महिन्याभरात न्याय देण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी दिले.
कणकवली विभागीय वीज वितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, तालुका अध्यक्ष दादा कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन म्हापणकर, कणकवली व्यापारी संघाचे सचिव विलास कोरगावकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, नांदगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष पप्पी सापळे, सचिव ऋषिकेश मोरजकर, प्रदीप हरमलकर, रघुनाथ लोके, संतोष घाडी आदींसह वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील वीज समस्यांबरोबरच नांदगाव शाखा कार्यालया अंतर्गत गावांमध्ये नांदगाव वीज ग्राहकांनी महिन्यापूर्वी घेराव आंदोलन केले होते .या आंदोलनानंतर कोणकोणती काम पूर्ण झाली? पुढील काळात राहिलेली कामे किती दिवसात पूर्ण करणार? यासंदर्भात या भेटीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपविभागीय अभियंता विलास बगडे यांनी असलदे ,नांदगाव, बेळणे, तोंडवली यासह विविध गावांमध्ये झालेल्या कामांची माहिती दिली. विज बिल वाटप करणाऱ्या एजन्सी कडून सातत्याने सूचना देऊन देखील वेळेत वीज बिलांची वितरण केले जात नाही. त्यामुळे नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गावांमधील वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. या संदर्भात तुमच्या स्तरावर तातडीने संबंधित एजन्सीला लेखी सूचना देण्यात यावी, अशी मागणी करत पुढील महिन्यात वेळेत वीज बिलाचे वितरण न झाल्यास वीज बिलांची होळी केली जाईल असा इशारा भगवान लोके यांनी दिला.
वीज बिले वेळेत न मिळाल्याने तालुक्यातील वीज ग्राहकांना फटका बसत आहे. ८० टक्के ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्या संदर्भात नियोजन करा. गणेश उत्सव काळात विद्युत पुरवठा सुरळीत राहायला पाहिजे, सणाचे दिवस आहेत जर वीज जात असेल तर त्या संदर्भात व्हाट्सअप ग्रुप वर साधारण किती वेळेत विज येईल याची माहिती देण्यात यावी. तसेच त्या गावच्या सरपंचांना या संदर्भात कळवल्यास नागरिकांना अंदाज येतो अशी सूचना नंदन वेंगुर्लेकर,राजेश राजाध्यक्ष,विलास कोरगावकर यांनी केली.
नांदगाव गावात अद्यापही आंदोलनाच्या वेळी सुचवलेली कामे झालेली नाही, ती केव्हा पूर्ण होणार? जुने पोल व लटकलेल्या वायरसंदर्भात प्राधान्याने कामे करण्यात यावी, आंदोलनानंतर जी जी कामे झाली, त्याची यादी महावितरण ने ग्राहकांपर्यंत सांगावी.अशी मागणी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,पप्पी सापळे यांनी केली. तसेच ३३ केव्ही लाईनबाबत वीज वितरणने काय केले? याबाबत विचारणा प्रदीप हरमलकर यांनी केली. वीज समस्यांबाबत सर्वच वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर नंदन वेंगुर्लेकर यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत, या संदर्भात त्याचा आढावा घेण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याची मागणी कार्यकारी अभियंताकडे केली. त्यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही बैठक लावली जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता श्री. माळी यांनी दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा