सिंधुदुर्ग today

 


कवी आशिष वरघणे यांना कविवर्य वसंत सावंत तर मनीषा शिरटावले यांना कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार जाहीर

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुरस्कार योजनेचे आयोजन

ऑगस्टमध्ये नांदगाव येथे मान्यवर साहित्यिकाच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

कणकवली/प्रतिनिधी

     नांदगाव (कणकवली) येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (रजि.) या वर्षापासून कोकण भूमिपुत्र कविवर्य वसंत सावंत आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचे काव्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. यावर्षीच्या या उपक्रमासाठी मागविण्यात आलेल्या कवितांमधून कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कारासाठी वर्धा येथील कवी आशिष वरघणे यांची तर कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारासाठी सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. सीमा हडकर यांनी या पुरस्कारा योजनेचे परीक्षण करून सदर कवींची या पुरस्कारांसाठी निवड केल असून १५०० रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली.

     मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी वेगवेगळे सांस्कृतिक - साहित्यिक उपक्रम राबविले जातात. यावर्षीपासून महाराष्ट्रातील नव्या गुणवान कवींना प्रेरणा मिळावी म्हणून कविवर्य वसंत सावंत आणि कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. यासाठी प्रत्येक कवीकडून पाच कविता मागविण्यात आल्या. या योजनेला नागपूर,मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, गोवा, बेळगाव, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागातून कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सहभागी होत महाराष्ट्रातील तीस कवीनी आपल्या पाच कविता पाठविल्या. त्यातून कवितेच्या गुणवत्तेचे निकष लावत परीक्षक प्रा. सीमा हडकर यांनी कविवर्य वसंत सावंत पुरस्कारासाठी वर्धा येथील आशिष वरघणे यांची तर कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारासाठी सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांची निवड केली. या परीक्षणासंदर्भात प्रा. हडकर म्हणतात, निबंधवजा कविता होण्याचे प्रकार आता वाढीस लागले आहेत.त्याचीच प्रचिती या कविता वाचतानाही आली. तर दुसऱ्या बाजूला पारंपारिक गेय कवितेतून आशयाच सपाटीकरणही जाणवलं. कवितेचा आशय शब्दाला एकरूप होत कविता अधिक एकसंध होत जायला हवी. कवी वरघणे आणि कवयित्री शिरटावले यांची कविता या निकषावर अधिक पात्र ठरली. त्याचबरोबर कवितेतील वास्तव आवाजी न होता अधिक संयमाने चिंतनशील मांडले गेले त्यामुळे या दोन कवींची सदर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. 

    दरम्यान सदर पुरस्कार वितरण समारंभ नांदगाव येथे ऑगस्टमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती श्री मोरजकर यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today