सिंधुदुर्ग today
मनीषा शिरटावले लिखित, प्रभा प्रकाशन प्रकाशित 'जीवन रंग' पुस्तकाचे 14 रोजी प्रकाशन
कवयित्री अंजली ढमाळ, शबनम मुजावर, सुनिताराजे पवार, डॉ.राजेंद्र माने, प्रदीप कांबळे आदींची उपस्थिती
कणकवली/प्रतिनिधी
साहित्य लेखनाच्या माध्यमातून तळकोकणच्या साहित्य संस्कृती चळवळीला जोडल्या गेलेल्या कवयित्री आणि लेखिका मनीषा शिरटावले यांच्या 'जीवन रंग' हा ग्रंथ कणकवली येथील प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.त्याचा प्रकाशन समारंभ रविवार 14 जुलै रोजी सायं.५.३० वा. सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
नव्या लेखकांना पुस्तक प्रसिद्धीचे माध्यम उपलब्ध व्हावे आणि त्यांची गुणवत्ता महाराष्ट्रभर विकसित व्हावी यासाठी कणकवली प्रभा प्रकाशनाने नव्या लेखकांची पुस्तक प्रकाशन मालिका सुरू केली आहे. त्या मालिकेतील हे पंधरावे पुस्तक असून त्याचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. सातारा येथील प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत कवयित्री अंजली ढमाळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कादंबरीकार डॉ राजेंद्र माने, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते प्रदीप कांबळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
अंजली ढमाळ यांनी जीवन रंग या ग्रंथाची पाठराखण केली असून त्यात त्या म्हणतात, शिरटावले यांनी रोजच्या जगण्यातील अनेक स्पंदने, अनेक पदर, अनेक ताणे - बाणे अतिशय साधेपणाने आर्ततेने आणि पोटतिडकीने आपल्या या स्फूट लेखनातून वाचकांसमोर उलगडून दाखवले आहेत. यामध्ये एक एक शब्द घेऊन काही संकल्पना, त्यांचा लेखिकेला गवसलेला अर्थ आणि त्या संकल्पनेची जोडले गेलेले भवतालातील संदर्भ याची सुंदर गुंफण या लेखनात केली आहे. तरी या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रभा प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा