सिंधुदुर्ग today

 


आजच्या जमातवादाचा मुकाबला करण्यासाठी साने गुरुजी पुन्हा समजून घेणे आवश्यक

'साने गुरुजी समजून घेताना' व्याख्यानात ॲड. देवदत्त परुळेकर यांचे प्रतिपादन

अभ्यासपूर्ण व्याख्यानाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली/प्रतिनिधी

      साने गुरुजींच्या नावाने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी वाचनालये, शाळा, उद्याने, रस्ते आहेत. परंतु साने गुरुजींचे अजरामर पुस्तक श्यामची आई व त्यावर निघालेला चित्रपट या खेरीज साने गुरुजींच्या अफाट कार्याची ओळख महाराष्ट्राला नाही.आजच्या जमातवादाचा मुकाबला करण्यासाठी साने गुरुजी पुन्हा समजून घेणे आवश्यक आहे.असे आग्रही प्रतिपादन साने गुरुजी जीवन चरित्राचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांनी "साने गुरुजी समजून घेताना" या व्याख्यानात केले.

       समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै  सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनात ॲड. देवदत्त परुळेकर यांचे 'साने गुरुजी समजून घेताना ' या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक रणधीर शिंदे, प्रमुख पाहुणे समीक्षक दत्ता घोलप समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, किशोर शिरोडकर, नामवंत कवयित्री अंजली ढमाळ, कवयित्री डॉ दर्शना कोलते सामाजिक कार्यकर्ते विलास कोळपे अंकुश कदम, मंगल परुळेकर, प्राचार्य गोविंद काजरेकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी बोलताना ॲड. परुळेकर म्हणाले खरा तो एकची धर्म म्हणणारे साने गुरुजी या प्रार्थना गीतातील प्रत्येक विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारे होते.

साने गुरुजींचे बालपण अत्यंत दारिद्र्यात अभावग्रस्त परिस्थितीत गेले. शिक्षणासाठी त्यांना अपार कष्ट सोसावे लागले. अनेक वेळा उपासमार, अवहेलना यांना सामोरे जावे लागले. खूप कष्टाने साने गुरुजींनी एमएपर्यंत  शिक्षण पूर्ण केले. दरम्यान त्यांच्या प्रेमळ आईचे निधन झाले होते हाही धक्का त्यांना सहन करावा लागला. कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्याची संधी असताना साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. ६ वर्षे ते शिक्षक म्हणून व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे रेक्टर म्हणून कार्यरत होते. विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विलक्षण प्रेम होते. आपल्या प्रेमळ कृतींमधून त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले, संस्कारीत केले आणि त्यांचे जीवनच बदलून टाकले.  

गांधी व विनोबांचे अनुयायीत्व पत्करून साने गुरुजींनी भारताच्या स्वातंत्र लढ्यात मोठा सहभाग घेतला. सुमारे ७ वर्षे गुरुजींनी सश्रम कारावास भोगला. अनेक वेळा त्यांना कारागृहातही अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. परंतु हिंमत न हारता त्यांनी या कारागृहातच अनेक पुस्तकांचे लेखन केले. स्वातंत्र्य लढ्यात ८ महिने गुरुजी भूमिगतही होते. आपल्या प्रभावी वाणीने त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केले आणि युवकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली.

दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी स्वातंत्र्य हवे याबद्दल साने गुरुजी आग्रही होते. त्याने शेतकरी व कामगार यांचे लढे उभारले. या लढ्यांमध्ये त्यांना प्रसंगी स्वकीय विरुद्ध भूमिका घ्यावी लागली व त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. परंतु गुरुजी हटले नाहीत. प्रसंगी आपला जीव पणाला लावून त्यांनी शेतकरी व कामगारांना न्याय मिळवून दिला. 

अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात हे प्रचंड कार्य करत असतानाच साने गुरुजी दोन साप्ताहिकांचे संपादनही करीत होते. याचवेळी त्यांनी ११३ पुस्तकांचे लिखाणही केले. अनेक देशी विदेशी पुस्तकांचे उत्तम भाषांतर केले. आपल्या कादंबऱ्यातून त्यांनी वैचारिक लढायांची भूमिका कशी मांडली आहे.आजच्या कालखंडातही साने गुरुजींचे विचार कसे महत्त्वाचे ठरतात याचे विवेचन करून साने गुरुजींनी युवकांसाठी कुठला कार्यक्रम सांगितलेला आहे याचेही दिशादर्शन परुळेकर यांनी केले.

        कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमिता तांबे यांनी ॲड.परुळेकर यांचा परिचय करून दिला व आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today