सिंधुदुर्ग today
मालवण येथे २३ रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन
नाथ पै सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन
संस्था पदाधिकारी मधुकर मातोंडकर, किशोर शिरोडकर यांची महिती
कणकवली/प्रतिनिधी
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे नाथ पै सेवांगण सभागृहात रविवार 23 जून रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून कोकणातील साहित्य रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण सतत वैचारिक उपक्रम आयोजित करत असते. हे सर्व उपक्रम सामाजिकते बरोबरच साहित्य कला संस्कृतीशी निगडित असतात. तर समाज साहित्य प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष समाज आणि साहित्य वेगळं नसतं या विचारातून काम करत आहे.या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे उद्दिष्ट एकच असल्यामुळे गेल्या वर्षापासून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान संयुक्तरित्या साहित्य विषयक उपक्रम राबवीत आहे. याचाच एक भाग म्हणजे हे एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन असल्याचेही श्री. शिरोडकर आणि श्री मातोंडकर यांनी सांगितले.
दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून साने गुरुजींची 125 वी जयंती असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारावर एक स्वतंत्र व्याख्यानही या संमेलनात आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध अभ्यासकांनी संपादित केलेल्या ग्रंथांचे प्रकाशन, काव्य पुरस्काराचे वितरण आणि खुले कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले असल्याचीही माहीती श्री.शिरोडकर आणि श्री मातोंडकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा