सिंधुदुर्ग today



'सिंधुदुर्गची नवी कविता ' काव्यसंग्रहाचे २३ रोजी रणधीर शिंदे यांच्या हस्ते मालवण येथे प्रकाशन

प्रा.संजीवनी पाटील, मधुकर मातोंडकर यांचे संपादन

समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळीचा उपक्रम.

कणकवली/ऋषिकेश मोरजकर 

          सिंधुदुर्गात अलीकडल्या काळात लिहू लागलेल्या कवींची गुणवत्ता चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावी या हेतूने समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळीच्या माध्यमातून 'सिंधुदुर्गची नवी कविता' हा काव्यग्रंथ संपादित करण्यात आला आहे. प्रभा प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला असून या ग्रंथाचे संपादन समीक्षक प्रा संजीवनी पाटील आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी केले. रविवार 23 जून रोजी मालवण येथे होणाऱ्या समाज संवाद साहित्य संमेलनात प्रसिद्ध समीक्षक प्रा.रणधीर शिंदे यांच्या हस्ते आणि संमेलनाचे प्रमुख पाहुणे समीक्षक प्रा दत्ता घोलप यांच्या उपस्थितीत या संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

          समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे कोकणाबरोबरच महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता अभिजात वाचकांसमोर यावी या हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर याआधी सिंधुदुर्गातील आजची कविता हा संग्रह प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर सारेच पुरुष नसतात बदनाम हा 19 कवियत्रींचा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यात आला. आणि आता सिंधुदुर्गची नवी कविता हा 16 कवींचा कवितांचा सहभाग असलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यात प्रियदर्शनी पारकर म्हाडगुत, किशोर कदम, डॉ. दर्शना कोलते, चेतन बोरेकर, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, प्रज्ञा मातोंडकर, योगिता शेटकर, प्रा. संतोष जोईल, ऋतुजा सावंत-भोसले, दिलीप चव्हाण, पल्लवी शिरगावकर, सुरेश बिले, सत्यवान साटम, रचना रेडकर, मंगल नाईक-जोशी,संदीप कदम यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा समावेश आहे. या कवींच्या कवितांविषयी आपल्या संपादकीय मध्ये संजीवनी पाटील,अनेक आयामांना सामावून घेणारी ही कविता निश्चितच आशादायी आहे. त्यासोबतच या कवितेचे भविष्यही तितकेच उज्वल आहे. हे लिहिणारे सगळेच कवी ज्या उमेदीने लिहितात, ती उमेदच त्यांना ऊर्जादायी ठरणारी आहे. स्वतःमधील संवेदनशीलता जागवतानाच भवतालाचा आवाज त्यांना अधिक संवेदनशील बनवतो.  शिवाय प्रत्येक काळाचा एक आवाज असतो. जेव्हा अशी संवेदनशील व्यक्ती हा आवाज ओळखते, तेव्हा तिच्या आतील आवाज प्रतिसादादाखल बाहेर पडतो. या कवी मंडळींचा हा प्रतिसादही तितकाच बोलका आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील ही नवी कविता म्हणजे आजच्या भवतालाचा एक असा आवाज आहे ज्याला नवे भान आहे. या प्रातिनिधिक संग्रहामध्ये जेव्हा या सर्वच कवींच्या कवितांचा समावेश केला गेला, तेव्हा त्यांच्या कवितेतील आशय हाच एक निकष समोर ठेवला. हे सर्वच कवी जिल्ह्याच्या जवळजवळ प्रत्येक तालुक्यातील आहेत. त्यांच्या कवितांमध्ये कुठे एकांगीपण येत नाही की आशयाच्या निमित्ताने कविता अपुरी वाटत नाही. हीच या संग्रहाची महत्त्वाची गुणवत्ता आहे.

उमेद वाढविणारे काम

        'सिंधुदुर्गची नवी कविता' हे संपादन म्हणजे सहभागी कवी आणि आम्ही संपादन करणारी मंडळी यांचं पुढील लेखन करण्याचं उमेद वाढविणार काम आहे. महाराष्ट्रात आज विपुल कविता लिहिली जात आहे; परंतु ती सोशल मीडियाच्या बाहेर गंभीरपणे पोहोचत नाही. मात्र समाज साहित्य चळवळीने असे गंभीर काम करून सिंधुदुर्गातील चांगली गुणवत्ता असणारी कविता सर्वदूर पोहोचविण्याचा चांगलं महत्त्वाचं काम केलं आहे. याचा आनंद होतो. असं मत या ग्रंथाच्या संपादिका संजीवनी पाटील यांनी व्यक्त केल आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today