सिंधुदुर्ग today


कठोर परिश्रमाशिवाय बुद्धाकडे जाणे अशक्य!

'बाबासाहेब समजून घेताना ' व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन

फोंडाघाट येथे बुद्ध - आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त व्याख्यानमाला

कणकवली/ऋषिकेश मोरजकर

        धर्म आणि धम्म यात मूलभूत फरक आहे. धर्मातून बहुतेक वेळा आपण पारंपारिक मानसिक तेथून जगत राहतो. आणि धम्मातून धर्माचीच चिकित्सा केली जाते. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान, सत्याचा विचार, समता न्याय आणि माणुसकी. मात्र हे सगळं अंगीकारण्यासाठी आणि बुद्ध तत्त्वज्ञान स्वीकारून यश मिळविण्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी याचेच अनुकरण केले म्हणून ते जगात महान ठरले. कठोर परिश्रमाशिवाय बुद्धाकडे आणि बाबासाहेबांच्या विचाराकडेही जाणे अशक्य असतं! असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बाबासाहेब समजून घेताना' या व्याख्यानात केले.

         भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने फोंडाघाट येथे व्याख्यान मालिका आयोजित करण्यात आली होती.या व्याख्यानमालेत 'बाबासाहेब समजून घेताना' हे तिसरे पुष्प गुंफताना कवी कांडर यांनी कुठल्याही महामानवाला देव बनवला जाऊ नये. हार तुरे घालून त्याची सतत पूजा केली जाऊ नये. महामानवांच्या प्रतिमेत आपण अडकलो की त्यांच्या विचारापासून दूर जातो, महामानवांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे आहे आणि यासाठी बुद्ध व बाबासाहेब यांनी सांगितलेला समतेचाच मार्ग महत्वाचा आहे असेही आग्रहाने सांगितले. यावेळी फ़ोडाघाट बौद्ध विकास मंडळ मुंबई  अध्यक्ष प्रदीप जाधव, कार्याध्यक्ष शैलेंद्र जाधव, संदीप जाधव, रवींद्र जाधव, पंढरी जाधव, मुंबई मंडळाच्या महिला अध्यक्षा प्रियांका जाधव, रुचिरा जाधव,रंजना जाधव,गांव शाखेचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव संतोष आखाडे, मिलिंद जाधव, संजय तांबे,उपाध्यक्ष उमाकांत जाधव,जयंत जाधव, महिला मंडळाच्या रुचिता जाधव, संचिता जाधव आदी उपस्थित होते.

           कवी कांडर म्हणाले, बाबासाहेबांनी धर्म नाकारला. कारण धर्माच्या नावाखाली येणाऱ्या अनिष्ट प्रथा त्यांना मान्य नव्हत्या धर्मातून जात निर्माण झाली,जातीतून भेद निर्माण झाला आणि भेदातून शोषितांचे अधिक शोषण  केले गेले म्हणूनच बाबासाहेब बुद्ध धम्माकडे वळले. धम्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग होय. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारून शोषितांचे दुःख निवारण्याचे मोठे काम केले. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचे अनुकरण करणे आणि शांती आणि समतेच्या मार्गाने जाणे म्हणजेच धम्माचेही अनुकरण होय! दुर्दैवाने आज समाजात यासंदर्भात बोलणाऱ्या व्यक्तीही इतरांचे शोषण करताना दिसतात. त्यामुळे शोषितातला शोषित अधिक शोषित बनवत आहे. आणि याचं कुणाला काहीच पडलेलं नाही. पण शेवटी बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारातूनच यावर मार्ग निघतो. यासाठी प्रत्येकाने बुद्ध धम्माचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आज भारताबरोबर जगात बुद्ध विचाराकडे मोठ्या प्रमाणात लोकवर्ग वळत आहे. याचं कारण या जगाला शांतीचा मार्ग बुद्धाकडून मिळतो. बाबासाहेबांनीही हेच शांतीचे विचार दिले आहेत. पण बहुतेक ठिकाणी अस्मितेचे टोक गाठले जात असल्यामुळे पुन्हा भेद निर्माण होत आहे. हा आंतर्विरोध समजून घेतला नाही तर भविष्यात मोठा संघर्ष अटळ आहे.

   संजय तांबे यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today