सिंधुदुर्ग today
बाबासाहेबांनी स्त्रीला जगण्याचा हक्क दिला
'बाबासाहेब आणि स्त्री हक्क' व्याख्यानात कवयित्री प्रमिता तांबे यांचे प्रतिपादन
फोंडाघाट येथे संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम
कणकवली/ऋषिकेश मोरजकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी जे योगदान दिले आहे. त्याची परतफेड करता येणार. हिंदू कोड बिल माध्यमातून स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. आज सर्व स्तरातील सर्व क्षेत्रात महिलांची जी प्रगती होत आहे त्यामागे बाबासाहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र गोरगरीबांना उच्च शिक्षण मिळाले तरच भविष्यात गोरगरीब बाबासाहेबांच्या शिक्षण धोरणाने पुढे जाणार आहेत; असे आग्रही प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका प्रमिता तांबे यांनी फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात केले.
फोंडाघाट येथे भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कवयित्री तांबे यांचे 'बाबासाहेब आणि स्त्री हक्क' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना कवयित्री तांबे यांनी १४ एप्रिल हा दिवस भारतात अनेक ठिकाणी 'समता दिन' तसेच 'ज्ञानदिवस' म्हणून साजरा केला जातो. ब्रिटन, कोलंबिया, कॅनडा या ठिकाणी सुद्धा १४ एप्रिल हा दिवस ' समता दिवस' म्हणून साजरा केला जातो. याचे मोल आपण लक्षात घ्यायला हवे आणि समतेच्याच मार्गाने आपण पुढे जायला हवे असेही सांगितले. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रदीप जाधव, कार्याध्यक्ष शैलेंद्र जाधव, संदीप जाधव, रवींद्र जाधव, पंढरी जाधव, मुंबई मंडळाच्या महिला अध्यक्षा प्रियांका जाधव, रुचिरा जाधव, रंजना जाधव,
गांव शाखेचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव संतोष आखाडे, मिलिंद जाधव, संजय तांबे, उपाध्यक्ष उमाकांत जाधव, जयंत जाधव, महिला मंडळाच्या रुचिता जाधव, संचिता जाधव आदी उपस्थित होते.
कवयित्री तांबे म्हणाल्या, "बाबासाहेब यांची जयंती हा जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीच्या बाहेरही बाबासाहेबांचा पुतळा आहे. जगातला नंबर १ चा स्कॉलर म्हणून आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच गणना केली जाते. स्त्रियांच्या हक्काची सातत्याने पायमल्ली होत असताना त्याला कायद्याचे संरक्षण दिलं पाहिजे आणि त्या कायद्याचं कोणी उल्लंघन केलं तर त्यालाही कठोर शासन झालं पाहिजे त्याच्यासाठीच्या सर्व तरतुदी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणलेल्या आहेत. २०१७ साली मॅटरनिटी लिव्ह जी १२ आठवड्यांची अगोदर होती ती वाढून २६ आठवड्यांची झाली. मॅटरनिटी बेनिफिट ॲक्टचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचला. वारसा हक्काने वडीलांच्या प्रॉपर्टीत स्त्रीचा हक्क आहे. विधवा असेल तर तिला पुनर्विचा हक्क प्राप्त झालेला आहे तो हिंदू कोड बिलामुळे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्रियांना मताधिकार देण्याबाबत काही चर्चा झालेली नव्हती. जेव्हा मॉन्टेगू जेम्स फर्ड सुधारणा धोरण अस्तित्वात आलं तेव्हा स्त्रियांना मताधिकार देण्याबाबत प्रतिपादन करण्यात आलं होतं परंतु तेही सशर्थ होतं. म्हणजे ज्या स्त्रिया शिक्षित, विवाहित आहेत आणि सधन आहेत त्यांनाच हा मताधिकार मिळणार होता. त्यानंतर १९३५ मध्ये जो गव्हर्मेंट ऍक्ट आला त्यामध्येही काही वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. ब्रिटन सारख्या देशांमध्ये महिलांना मताधिकार मिळण्यासाठी लढावं लागलं. बाबासाहेबांच्या संविधानाने १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला मताधिकार बहाल केला.
या संयुक्त जयंती उत्सवाचे आभार संजय तांबे यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा