सिंधुदुर्ग today
सिंधुदुर्गातील दिव्यांग गुणी कवीचा पुण्यात गवगवा
कवी सफरअली यांच्या कवितांना अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, कवयित्री अंजली ढमाळ यांनी लावले चारचाँद!
कणकवली/ऋषिकेश मोरजकर
सिंधुदुर्ग मधील नामवंत दिव्यांग कवी सफरअली इसफ म्हणजे साहित्यक्षेत्रातील अजातशत्रू. त्यांची कविता म्हणजे आजच्या धर्मांध शक्तींवर प्रहारच. मराठी कवितेत आजवर न लिहिले गेलेले धाडसी अनुभव त्यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केले. आणि या कवितेला पुण्यातील अभिजात रसिकांनीही जोरदार प्रतिसाद दिला. निमित्त होते ते अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, आणि नामवंत कवयित्री अंजली ढमाळ यांनी सफरअली यांच्या 'अल्हाह ईश्वर' काव्यसंग्रहामधील कवितांचे प्रभावी केलेले सादरीकरण!
राष्ट्र सेवा दलने पुणे साने गुरुजी स्मारकात आयोजित केलेल्या त्यांच्या पहिल्याच अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त सदर कविता सादरीनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाहेर पाऊस पडत होता आणि सभागृहात अर्थवाही भाववाही कविता सादरीकरणाने श्रोते कवितेत चिंब न्हाऊन निघाले होते.यावेळी अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते कवी अजय कांडर, ज्येष्ठ अभ्यासिका प्रा वंदना पलसाने यांच्यासह, कार्यक्रमाचे संयोजक तथा विख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे, वैशाली भंडारे, कवी सफरअली इसफ, कादंबरीकार सुशील धसकटे, नाटककार राजकुमार तांगडे, नामवंत कवी खलील मोमीन, मुस्लिम इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद, ज्येष्ठ लेखिका इंदूताई जोंधळे, कथा लेखिका सुचिता घोरपडे, कवी महावीर कांबळे, ज्येष्ठ अभ्यासिका प्रा.प्रतिमा परदेशी, अ.भा.विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष किशोर ढमाले, कवी पंडित कांबळे, अभिनेते अभय खडपकर, कवयित्री प्रियदर्शनी पारकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कवयित्री अंजली ढमाळ यांनी संहिता लेखन केलेल्या या कार्यक्रमात प्रारंभ अल्लाह ईश्वर ही कविता सादर करून कवी एकूणच समाजासाठी सद्भावना कशी व्यक्त करतो याची अनुभूती उपस्थित रसिकांनी घेतली.
*ज्यांनी शांती आणि सद्धभावनेसाठी*
*कधीही गायली नाही एखादी नज्म*
*किंवा केली नाही दयामाया*
*अशांच्याही मुखात सदैव* *एकत्र नांदू दे*
*अल्लाह आणि ईश्वराचे नाम*
*धर्माच्या सीमेचे कुंपण ओलांडून*
*सर्व मंगल कल्याणासाठी*
भारताचा बहूसंस्कृतिक ढाचा आणि सर्वसामान्य माणसाचे त्यामधील जगणं, भोगणं , तगमग आणि मागणं व्यक्त करणारी कविता अल्लाह ईश्वर या काव्य संग्रहातून सफरअली इसफ घेऊन आलेले आहेत.खरंतर सर्व धर्म मानवतेचीच शिकवण देतात. आपण एकाच निर्मात्याची लेकरं आहोत हे वारंवार उद्धृत होत. तरीही दुजेपणाच्या विचारांनी वातावरण पुन्हा पुन्हा दूषित होत राहते आणि म्हणून पुन्हा पुन्हा आर्ततेने आर्जव करावे लागते सौहार्दपूर्ण शांततेचे, सहिष्णुतेचे आणि सर्वांभूती प्रेमाचे.अशा मूक वेदनेची भळभळ व्यक्त करणार्या, आसपासचा भवताल टिपणार्या आणि सहिष्णुतेला प्रेमळपणे साद घालणार्या कविता सफरअली लिहितात.याच आशयाची मग सफर यांची पुढील कविता मुक्ता कदम यांनी सादर करून जोरदार प्रतिसाद मिळवला.
*सतत वाहत जाणाऱ्या दुःखात*
*जखमाळलेल्या हातांनी अश्रू पुसत*
*जगण्यातील व्यथांचे सगळे* *हलाहल ओठात नी पोटात पचवून*
*निघालाय हा तांडा*
भारतीय समाजाचा पट बहुभाषिक, बहुधार्मिक असा आहे.अशा असंख्य उभ्या आडव्या धाग्यांच्या विणीने प्रत्येक माणूस कुठं ना कुठं एकमेकांशी जोडला गेलेला आहे.अशावेळी आपपरभावाचा द्वेषराग आळवला गेला तर या सर्वांग सुंदर समृद्ध अशा समाजवस्त्राच्या चिरफळया होऊ लागतात.असं होणं कुठल्याही एकाच समाजघटकाला घातक नाहीय तर संपूर्ण समाजास हे मारक आहे. म्हणून एका संवेदनशील नागरिकाचे मनोगत सफरअली आपल्या कवितेतून मांडतात. आणि ती कविता अंजली ढमाळ धीरगंभीरपणे सादर करताना पुढील ओळीतील भाव आपल्यापर्यंत नेमकेपणाने पोहचत जातो
*जात धर्म माणसाच्या नसानसात*
*केव्हाच भिनेल सांगता येत नाही*
*आता मनभेद होण्यापूर्वीच*
*सारे संदर्भ पुन्हा जोडावे म्हणतो*
सफरअली हे कवितेतून वेदना मांडतात परंतु त्यात रडगाणं नाहीये. सफर यांच्या अल्लाह ईश्वर मधील कविता आयुष्यात अतिशय सकारात्मकतेने सामोरं जाण्याची आणि आशावाद जागावण्याचीही भाषा बोलतात.म्हणूनच कृतार्थ शेवगावकर यांनी शेवटी सादर केलेल्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहिलेल्या कवितेत सफरअली म्हणतात
*कुठलाही जात-धर्माचा मोहल्ला*
*तूच बहाल केलेल्या लोकशाही विचारावर*
*अजून शाबुत आहे*
*इथल्या मातीत*
अल्लाह ईश्वर कविता संग्रहातील या सगळ्या कविता ऐकताना शेवटी मनात वाटून गेलं; या सर्व कविता मुळातून वाचल्या पाहिजेत!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा