सिंधुदुर्ग today
सफरअली यांची कविता सगळ्या शोषितांना एकत्र बांधते
अभ्यासक प्रा वंदना फलसाने कवी अजय कांडर यांच्या हस्ते 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन
राष्ट्र सेवा दलतर्फे पुण्यात साहित्य नाटक चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा.
कणकवली/ऋषिकेश मोरजकर
कवी सफरअली इसफ यांची कविता आजच्या भारतीय मुस्लिम वर्गाच्या कोंडीच प्रतिनिधित्व करत असली तरी ती सगळ्या अल्पसंख्यांक शोषित वर्गांच्या वेदनेला एकत्र बांधते. ही कविता भारतीय पातळीवर पोहोचायला हवी. ती विविध भाषेत भाषांतरित होऊन तिला बहुमुखी वाचक लाभायला हवा एवढी त्या कवितेची गुणवत्ता मोठी आहे असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासिका प्रा.वंदना पलसाने यांनी कवी सफरअली इसफ यांच्या 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले. पुणे साने गुरुजी स्मारक येथे प्रा.पलसाने आणि नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला साहित्य नाटक चित्रपट संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पुणे राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रारंभी अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, कवयित्री अंजली ढमाळ यांनी 'अल्लाह ईश्वर' मधील कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. कवितेचा आशय नेमकेपणाने पोचविणाऱ्या या कविता सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांमधून जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी कवी सफरअली इसफ, मुमताज बेगम शेख - इसफ, कार्यक्रमाचे संयोजक विख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे, वैशाली भंडारे,जेष्ठ कवी खलील मोमीन, विचारवंत सफराज अहमद, नाटककार राजकुमार तांगडे,ज्येष्ठ लेखिका इंदुताई जोंधळे, प्रा.प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, कथा लेखिका सुचिता घोरपडे, कादंबरीकार सुशील धसकटे, कवी प्रशांत चव्हाण,सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कवी महावीर कांबळे, पंडित कांबळे, दिलावर इसफ, गायक अंकुश कांबळे, कवयित्री प्रियदर्शनी पारकर, अभिनेता अभय खडपकर, शाहीर शाहिद खेरटकर, इस्माईल माडीघर,नय्युम माडीघर, सामाजिक कार्यकर्ते परवेज कुरेशी, आदिल शेख,मुनीरा शेख, नौशेरवान शेख, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्टचे सेक्रेटरी यासिन बोथरे, हुसैनमिया बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजय कांडर म्हणाले, इसफ यांची 'अल्लाह ईश्वर ' काव्यसंग्रहातील कविता खऱ्या अर्थाने आताची, आजची कविता आहे. अखंड मानवतेच गीत गाणारी ही कविता वाचल्यावर वाचकाला आतून ती ढवळून काढते व वाचकाच्या डोळ्यात अंजन घालते. हे या कवितेचे सर्वात मोठे यश आहे. कवीने वेदना भोगली, अन्याय अत्याचाराला तो सामोरा गेला, दु:ख, दारिद्रयाचे चटके त्याने सोसले, पदोपदी देशभक्ती सिध्द करण्याच्या यातना सहन केल्या हे आजचे मुस्लिम अल्पसंख्याक वर्गाचे भयावह चित्र तो आपल्या कवितेतून मांडतो.आज देशभक्तीची फुटपट्टी लावून धर्माला मोजले जात आहे याची कहाणी तो सांगतो. त्याला वाटत असलेल्या दडपशाहीच्या लोंढ्यामागे किती दिवस फरपटत जाणार आम्ही. खरंतर कवीने मांडलेल्या या दुःखाची गाथा कुणाच्याही वाट्याला येऊ नये.
संदेश भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. कवी खलील मोमीन, सरफराज अहमद यांच्या हस्ते प्रा.पलसाने, अजय कांडर, सफरअली इसफ, मुक्ता कदम, कृतार्थ शेवगावकर, अंजली ढमाळ यांचे स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात साहित्य रसिक वर्ग उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा