सिंधुदुर्ग today
२२ रोजी जिल्हा ठाकरे शिवसेनेकडून विविध धार्मिक उपक्रम
कणकवली प्रतिनिधी
अयोध्या येथील रामजन्मभूमी येथे २२ रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार, १८ जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
तब्बल ५०० वर्षांनंतर अयोध्येत रामलल्ला विराजमान होत आहेत. आपल्या श्रद्धास्थानावरील हक्कासाठी चाललेला लढा यशस्वी झाला, ही बाब आनंददायक आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी ठाम भूमिका घेतली होती. प्रत्येक हिंदू बांधवाने हा दिवस सणासारखा साजरा करायला हवा, असे पारकर म्हणाले.
श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण परिसरातील मंदिरांना रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच महाआरती, मशाल मिरवणूक, रांगोळी स्पर्धा, भजने, श्रीरामनाम जप, रामरक्षा पठण, मारुतीस्तोत्र पठण, दीपोत्सव, महाप्रसाद, चित्ररथ मिरवणूक असे धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.सर्व भारतीयांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, आणि हा सोहळा अविस्मरणीय करावा, असे आवाहन पारकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा