सिंधुदुर्ग today
हुंबरट प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न .
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
------------------------------------------
कणकवली:जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आभिव्यक्ती आणि बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा या उद्देशाने गेली अनेक वर्षे सुरू असलेला बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन २०२३/२४ चा पंचायत समिती कणकवली ,शिक्षण विभाग हुंबरट प्रभागाच्या वतीने केंद्रशाळा सावडाव नं.१ च्या भव्य क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हुंबरट प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सावडाव केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, नांदगाव केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, जानवली केंद्रप्रमुख के.एम.पवार, बिडवाडी केंद्रप्रमुख रुची कवटकर यांच्या सहयोगातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या बाल कला, क्रीडा महोत्सवाचे सावडाव सरपंच आर्या वारंग आणि उपसरपंच दत्ताराम काटे यांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रीडाज्योत प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते परशुराम झगडे, तसेेच सावडाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, हुंबरट प्रभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या कला, क्रीडा गुणांच्या विकासाबरोबरच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याची जिद बाळगावी आणि अधिक जलद, आधिक उंच, अधिक बुद्धिमान व्हावे असे प्रतिपादन सरपंच आर्या वारंग यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, अनघा चिपळूणकर, के. एम.पवार, रुची कवटकर, क्रीडाप्रमुख किसन दुखंडे, उपक्रीडाप्रमुख बजरंग मोहिते, केंद्रमुख्याध्यापिका प्रणिता लोकरे यांनी केले.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर क्रीडा संचलन जिल्हा क्रीडा शिष्यवृत्तीधारक हर्षली सावंत आणि इतर विद्यार्थ्यांनी केले तर सर्व स्पर्धकांना क्रीडा शपथ कार्तिकी काटे हिने देऊन सर्व स्पर्धा निकोप आणि खिलाडूवृत्तीने खेळण्याची प्रतिज्ञा दिली.
सावडाव केंद्रातील शिक्षकवृंदांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले .
शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना सांगितले की,जीवनात आपल्याला अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागते. बालवयापासूनचञआपण आपल्या अंगी असलेल्या उपजत गुणांचा विकास केला आणि यथायोग्य मार्गदर्शन घेतले तर प्रत्येक क्षेत्रात उज्वल यश संपादन कराल. यासाठी सतत प्रयत्न, मेहनत आणि चिकाटी महत्वाची आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक क्रीडाप्रमुख किसन दुखंडे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम आणि आभार अशोक देशमुख यांनी मानले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व क्रीडा पंचप्रमुख, सहाय्यक पंच तसेच सावडाव गावातील ग्रामस्थ, सावडाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक वारंग आणि सर्व सदस्य, सावडाव माजी विद्यार्थी संघ यांनी यशस्वी व्यवस्थापन केले.
विजेत्या सर्व स्पर्धकांना प्रभागाच्या वतीने सन्मानपत्र आणि सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजेत्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्हे निवृत बॅक अधिकारी चंद्रकांत सावंत आणि कुटुंबिय यांनी पुरस्कृत केली होती.
स्पर्धा पार पाडण्यासाठी हुंबरट प्रभागातील चारही केंद्रातील सर्व शिक्षक आणि सावडाव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा