सिंधुदुर्ग today
उच्चवर्ग साहित्य वर्चस्वामुळे मराठी साहित्याचे नुकसान*
तिसऱ्या समाज विचार साहित्य संमेलनात समीक्षक नितीन रिंढे यांचे परखड मत
समाज साहित्य विचार संमेलनाला मुंबई ग्रंथ संग्रहालयाकडून सर्वतोपरी मदत करण्याची भालचंद्र मुणगेकर यांची ग्वाही.
समाज साहित्य विचार संमेलनाचं सगळ्यांकडूनच कौतुक
कणकवली/प्रतिनिधी
उच्चवर्ग साहित्य वर्चस्वामुळे मराठी साहित्याचे नुकसान झाले असून यामुळेच पहिले शिवचरित्र, बुद्धचरित्र लिहिणारे सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या इतिहास लेखनाची उपेक्षा झाली. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणही घेता आले नाही. मात्र त्यांनी लिहिलेला इतिहास वस्तुनिष्ठ असून त्याची दखल अनंत काळ घ्यावी लागणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी समीक्षक आणि भाषा अभ्यास नितिन रिंढे यांनी तिसऱ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केले.
सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानचे तिसरे समाज साहित्य विचार संमेलन प्रा. रींढे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ लेखक - माजी राज्यसभा सदस्य डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई ग्रंथ संग्रहालय दादर येथे आयोजित करण्यात आले. चित्रपट नाटक संगीत साहित्य आदी क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी झालेल्या या संमेलनात बोलताना प्रा.रिंढे यांनी गुरुवर्य केळुसकर यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेतला आणि समाज साहित्य प्रतिष्ठान ही संस्था गुरुवर्य केळुसकर यांच्या विचाराने पुढे जात आहे ही आजच्या काळातली महत्त्वाची घटना असल्याचेही मत अधोरेखित केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ विचारवंत आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचा इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुस्कर पुरस्कार विजेते चंद्रकांत वानखडे,समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर,अध्यक्ष मधुकर मातोंडकर कार्यवाह वैभव साटम, कवयित्री अंजली ढमाळ, संमेलन संयोजक विजय सावंत, प्रियदर्शनी पारकर,संतोष जोईल, तुषार नेवरेकर आदी उपस्थित होते.
डॉ.मुणगेकर म्हणाले, केळुसकर गुरुजींच्या स्मरणार्थ समाज साहित्य प्रतिष्ठानचे काम सिंधुदुर्गात चालू आहे आणि मला याची कल्पना नाही; मात्र यापुढे समाज साहित्य प्रतिष्ठानला माझ्या वतीने सर्व सहकार्य मिळेलच परंतु एका विचाराच्या पातळीवर ही संस्था काम करत असल्यामुळे यापुढे समाज साहित्य प्रतिष्ठानला मुंबई ग्रंथ संग्रहालयाचे सभागृह मोफत दिले जाईल. हुकूमशाहीचे दिवस चालू आहेत.अशावेळी लेखकांची जबाबदारी मोठी असून विचाराच्या पातळीवरच साहित्याचे काम होत राहिले पाहिजे. ही भूमिका घेऊन समाज साहित्य प्रतिष्ठान विचार संमेलन आयोजित करते याबद्दल या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
वानखडे म्हणाले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकमेकांचे कौतुक करण्याचे सोहळे सर्व क्षेत्रात चालू असताना समाज साहित्य प्रतिष्ठान विचाराच्या पातळीवर काम करत आहे. अशी तरुण पिढी जेव्हा काम करते तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीला काहीतरी करावसं वाटतं, बोलावसं वाटतं. लोकशाही धोक्यात आली आहे आणि याची जाणीव साहित्यिकांनाही व्हायला हवी आणि अशा साहित्यिकांपैकी समाज साहित्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत म्हणूनच या संस्थेचा मी इतिहासकार कृष्णाराव अर्जुन पुरस्कार स्वीकारला आहे. पुरस्कार खूप दिले जातात पण तो पुरस्कार कोण देतो हे महत्त्वाचे असते. स्वतःची स्पष्ट भूमिका घेऊन या संस्थेचे काम चालू आहे. त्यामुळे या संस्थेला जोडून राहायला मला आनंदच होईल! यावेळी कवी अजय कांडर यांनी आपल्या भाषणात समज साहित्य प्रतिष्ठानची भूमिका विषद केली
संमेलनात औरंगाबाद, पुणे,मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून रसिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यात अभिनेते, कवी किशोर कदम, ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस, हिंदी अनुवादक रमेश यादव, गायिका सुनंदा दैंडकर, संध्या नरे पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, विलास कोळपे, सुबोध मोरे, साहित्य अकादमीचे माजी सचिव प्रकाश भातांब्रेकर, चित्रकार प्रभाकर वाईरकर, शेमानु टीव्ही चॅनेलचे बिझनेस हेड दीपक राज्याध्यक्ष, कवी डॉ.श्रीधर पवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती पत्रिकेचे संपादक देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण, सूर्यकांत मालुसरे यांच्यासह चित्रपट नाटक संगीत, साहित्य,पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत वानखडे यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांची ‘ भाकरीचा चंद्र ‘ ही प्रसिद्ध कविता वाचली आणि कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात चंद्रकांत वानखडे यांना ‘ इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर पुरस्कार’, कवी ऐश्वर्या रेवडकर आणि जयदीप विघ्ने यांना ‘ जयंत पवार कथा पुरस्कार’ , विजय जावळे यांना ‘काशीराम आत्माराम साटम स्मृति समाज साहित्य कादंबरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कुसुमाकर मासिकाचे संपादक श्याम पेंढारी आणि एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव या दोघांना ‘ बालसन्मित्र’कार ‘ पां. ना. मिसाळ ’ सन्मानाने सन्मानित करण्यात आले. यावेळी समीक्षक जिजा शिंदे यांच्या समीक्षा ग्रंथाचे कवी संतोष जोईल यांच्या काव्यसंग्रहाचे आणि संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. वैभव साटम यांनी प्रास्ताविक केले.मधुकर मातोंडकर यांनी आभार मानले.
संमेलनाच्या दुसऱ्या सतत कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कविसंमेलनात अविनाश गायकवाड, वर्जेश सोलंकी, जिजा शिंदे, अंजली ढमाळ, महेश लीला पंडित, बालिका ज्ञानदेव, संगीता अरबूने, रमेश सावंत, विजय सावंत, प्रियदर्शिनी पारकर, संतोष जोईल, रमेश सावंत यांनी कवितावाचन केले. या प्रसंगी सर्व कवी आणि कवयित्री यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कविसंमेलनाचा आढावा घेताना अध्यक्ष डॉ. सिसिलिया काव्हालो यांनी कवींच्या कवितांतून स्त्री जाणिवा आणि सामान्य लोकांप्रती व्यक्त झालेल्या भावना प्रतिबिंबित झाल्याचे सांगितले. कवीसंमेलनाचे सूत्र संचालन कवयित्री संगीता अरबूने आणि प्रियदर्शिनी पारकर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा