सिंधुदुर्ग today



समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा बालसन्मित्रकार पा.ना मिसाळ सन्मान प्रकाश जाधव आणि श्याम पेंढारी यांना जाहीर

उद्या 16 डिसेंबर रोजी मुंबई येथे भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते वितरण

संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम यांची माहिती

कणकवली/ऋषिकेश मोरजकर

     समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे दरवर्षी बालसन्मित्रकार पा.ना मिसाळ सन्मान दिला जातो. यावर्षीच्या या सन्मानासाठी नव्या साहित्यिक कवी लेखकांसाठी आणि नाट्य चित्रपट मालिका मध्ये काम करणाऱ्या नव्या कलावंतांसाठी कार्यरत राहणाऱ्या प्रकाश ग. जाधव आणि कुसुमाकर मासिक चालवून नव्या लेखक कवींना प्रोत्साहन देणारे श्याम पेंढारी यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार 16 डिसेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या तिसऱ्या समाज साहित्य विचार संमेलनात  संमेलनाचे प्रमुख पाहुणे माजी राज्यसभा सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सदर दोन मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि वैभव साटम यांनी दिली.

        समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संस्था गेली काही वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्याचे काम करत आहे. यावर्षी या पार्श्वभूमीवर मालवण सुपुत्र बालसन्मित्रकार पा.ना मिसाळ यांच्या नावाने केल्या जाणाऱ्या या सन्मानासाठी प्रकाश ग. जाधव आणि श्याम पेंढारी यांची निवड करण्यात आली.

     प्रकाश ग. जाधव गेली 40 वर्ष मुंबई सारख्या मोठ्या शहरात पदर मोड करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतात. हे कार्यक्रम राबविताना महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या पण गुणवत्ता असणाऱ्या कवी लेखकांना प्रेरणा देण्याचे ते काम करत असतात. त्याचबरोबर मराठी चित्रपट नाटक मालिका गायन नृत्य या क्षेत्रातील नव्या कलाकारांनाही ते प्रोत्साहन देत असतात. श्याम पेंढारी हे गेली अनेक वर्ष सातत्याने कुसुमाकर मासिक चालू महाराष्ट्रातील नव्या लेखक कवींना प्रोत्साहन देतात. कुसुमाकर मासिकात प्रसिद्ध झालेले कवी लेखक पुढे मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात अधिक स्थिर झालेले आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाज साहित्य प्रतिष्ठानने एकमताने या दोघांची बालसन्मित्रकार सन्मानासाठी निवड केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today