सिंधुदुर्ग today
समस्त नांदगाव वासियांच्या मागणीवरून हायवे संदर्भात ९ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण
उपोषण होणारच ; आज चर्चेला आलेल्या अभियंता यांना ठणकावून सांगितले
उपोषणावेळी नांदगाव हद्दी मधील हायवे संदर्भात मंजुरी नकाशा आणा व त्याप्रमाणे जनतेला दाखवा ; सरपंच भाई मोरजकर यांनी मांडली भुमिका
ऋषिकेश मोरजकर | नांदगाव
नांदगाव येथील हायवे संदर्भात बरेच प्रलंबित प्रश्न सातत्याने पाठपुरावा करूनही मार्गी लागत नसल्याने गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून नांदगाव तिठा ब्रिज खाली आमरण उपोषण केले जाणार असल्याचा इशारा
नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.या उपोषणात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत प्रत उपविभागीय अधिकारी कणकवली तसेच पोलीस निरीक्षक कणकवली यांना सादर करण्यात आले आहे.
९ रोजी चे उपोषण होणारच असल्याचे आज चर्चेला आलेल्या हायवे प्राधिकरण अभियंता यांना ठणकावून सांगत उपोषणावेळी येताना नांदगाव हद्दी मधील हायवे संदर्भात मंजुरी नकाशा आणा व त्याप्रमाणे जनतेला दाखवून द्या की अशा पध्दतीने कामे आहेत व अशी कामे झालेली आहेत. अशी भुमिका आज नांदगाव ग्रामपंचायत येथे हायवे प्राधिकरण व केसीसी यांच्या समवेत सरपंच भाई मोरजकर यांनी मांडली आहे.
यावेळी अभियंता श्री अतुल शिवनिवार,उप अभियंता कुमावत, केसीसी चे पांडा, माजी सरपंच संजय पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, मंगेश परब, भुषण म्हसकर आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण अंतर्गत नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या अखत्यारीत येणारी बरीच कामे प्रलंबित आहेत. आणि या संदर्भात आपल्याशी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे.दिनांक 20 /07/ 2023 रोजी एक पत्र पाठवले आहे ,दिनांक 28 /8 /2023 रोजी एक पत्र पाठवलेले आहे त्यानंतर 31/ 8 /2023 रोजीच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार 05/10/ 2023 रोजी एक पत्र पाठवलेले आहे.आपण केवळ आश्वासन देण्याकडे काही केलेले नाही आपल्या कामांमध्ये प्रगती दिसत नाही . आणि आपणास काही करण्याची इच्छाही दिसत नाही. सबब आम्ही सर्व ग्रामसभेमधे ठरल्याप्रमाने सर्व ग्रामस्थांसहित दिनांक 9/ 11/ 2023 रोजी नांदगाव तिठा ब्रीज खाली आमरण उपोषणाला बसणार असल्याचे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा