सिंधुदुर्ग today
ओसरगांव येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवशीय बालकुमार साहित्य- कला संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिवलकर यांच्या हस्ते उद्घघाटन.
राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन.
राजे प्रतिष्ठान सिंधू आणि संस्था पदाधिकाऱ्यांची माहिती.
कणकवली/ऋषिकेश मोरजकर
मुलांना शालेय जीवनातच साहित्य कला संस्कृती आदी संदर्भात आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या उपजत गुणांना प्रेरणा मिळावी यासाठी राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नं.१ च्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर महिन्यात एकदिवशीय साहित्य- कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ओसरगांव प्रा.शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे तर संमेलनाचे उद्घघाटक म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिवलकर यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवबा अपराज, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अँड.विलास परब आणि मुख्याध्यापक किशोर कदम यांनी दिली.
बदलत्या काळात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवायचे असेल तर शालेय जीवनापासून कला संस्कृतीचे संस्कार त्याच्यावर होणे गरजेचे आहे. यासाठी शाळेतील शिक्षक जेवढी मेहनत घेऊ शकतात तेवढीच मेहनत गावातीलही सुशिक्षित तरुणांनी घेण्याची गरज असल्यासचे लक्षात आल्यावर ओसरगाव येथील राजे प्रतिष्ठान सिंधूच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी गावातील शैक्षणिक कामाला प्रारंभ केला आणि यातूनच एक दिवशीय विद्यार्थी साहित्य कला संमेलनाचे आयोजन करण्याची कल्पना पुढे आली. राजे प्रतिष्ठान सिंधू प्रारंभी खेळ आणि इतर क्षेत्रात गावात काम करत होते. पण तरुणांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आता हे प्रतिष्ठान शैक्षणिक दृष्ट्या कार्यरत झाले असून आता प्रतिष्ठानने ओसरगाव गावच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या एक दिवशीय साहित्य संमेलनाचेही आयोजन केले आहे.
डिसेंबर मध्ये होणाऱ्या या संमेलनाची रूपरेषा आणि संमेलन तारीख काही दिवसातच जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही राजे प्रतिष्ठान सिंधू आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.संमेलनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क- 94229 63655
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा