सिंधुदुर्ग today
गावच्या विकासाचा आराखडा बनवताना परिपूर्ण तयार करा. - अरुण चव्हाण
ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळा ; सरपंचांनी कुटुंबांचा,वाडी ,गावच्या गरजा ओळखून आराखडा बनवावा.
कणकवली |(ऋषिकेश मोरजकर)
कणकवली कणकवली तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंचांनी गावचा विकास आराखडा करताना परिपूर्ण आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. आराखड्यात काम सुचवताना संबंधित विकास कामाच्या जमिनीचा प्रश्न लक्षात घेऊनच सुचवली पाहिजेत. १०० टक्के निधी खर्च करण्याच्या दृष्टीने आराखडा आवश्यक आहे ,नुसता कॉपी-पेस्ट आराखडा करू नका. त्यामुळे विकास कामे होताना अडचणी निर्माण होत आहेत. सरपंचांनी कुटुंबाचा, वाडीचा आणि संपूर्ण गावाचा अभ्यास करुनच आणि गरजा ओळखून आराखडा बनवावा,असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले.
कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती कणकवली च्या वतीने आयोजित ग्रामपंचायत विकास आराखडा सरपंच,ग्रामविकास अधिकारी ,ग्रामसेवक दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती कक्ष अधिकारी अनिल चव्हाण,विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग,अधीक्षक मनीषा देसाई,चंद्रसुभाष परब, प्रशिक्षक पंढरी माणगावकर, रितू पांचाळ ,तालुक्यातील ४२ सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
आपला गाव आपला विकास..ही संकल्पना सर्वांनी डोळ्यासमोर ठेवत काम करा.शिक्षण,आरोग्य ,उपजीविका यावर २५ टक्के खर्च करा. त्याला कुठल्याही पद्धतीत तांत्रिक मान्यतेची गरज नसते. आराखडा हा चर्चेतून बनवला पाहिजे, ज्या ग्रामपंचायतीमध्ये १४ वित्त आयोग आणि १५ वित्त आयोग मधील शिल्लक निधी आहे. तो १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने सर्वांनी काम करा,असे आवाहन अरुण चव्हाण यांनी केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी केले.तर प्रशिक्षक पंढरी माणगावकर, रितू पांचाळ यांनी गावच्या विकासाबद्दल सरपंच आणि ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा दोन दिवसीय आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा