सिंधुदुर्ग today

.......................................

सिंधुदुर्ग टुडे' या मीडियाच्या माध्यमातून आम्ही गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका चालू केली आहे. या मालिकेतील यावेळचे मानकरी आहेत दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र प्रसिद्ध कवी आणि सेवाभावी शिक्षक विजय अर्जुन सावंत!*

.......................................


कुंब्रल गावचे नाव उंचावणारे विजय सावंत

प्रसिद्ध कवी ते सेवाभावी  शिक्षक

         

      गुरू माझी माऊली

सिंधुदुर्ग/ऋषिकेश मोरजकर

     ज्ञानदान करणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षकाचाही सर्वांगीण विकास झालेला पाहिजे! असा सर्वांगीण विकास झालेले शिक्षक म्हणजे कोकणातील प्रसिद्ध कवी विजय अर्जुन सावंत. सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणून ते अग्रेसर आहेतच परंतु वेळप्रसंगी सेवाभावी वृत्तीने कोणत्याही प्रकारचे सहयोग देण्याचे योगदान त्यांनी आजवर दिल्यामुळे कवी सावंत यांनी कायमच आपल्यातील संवेदनशीलता जोपासली. त्यांच्या या सर्व सेवाभावी विकसनशील वाटचालीला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

         विजय अर्जुन सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल या गावचे सुपुत्र असून ते मुंबईत शिक्षण निरिक्षक कार्यालयात, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत आहेत.त्याचवेळेस ते सोशल सर्व्हिस लीग नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, परेल मुंबईत येथे शिक्षक म्हणूनही काम करतात.मुंबई बरोबर तळकोकणात कार्यरत असलेल्या समाज साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी तळकोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. कोकणातील प्रसिद्ध कवी म्हणून त्यांचा नावलौकिक आहेच परंतु एक कथाकार म्हणूनही त्यांची वाटचाल चालू आहे. सदैव हसतमुख असणार हे व्यक्तिमत्व. शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्र समाजाला कधीच विसरता येणार नाही. या कामातून त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षकी पेशालाच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे!

                     विजय सावंत हे बहूआयामी,अष्टपैलु व्यक्तिमत्व असून ते एकाचवेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात काम करीत आहेत.मुंबईत शिक्षण क्षेत्रात काम करीत असतांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन स्तरावरून वेळोवेळी राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांचे आयोजन,नियोजन व अंमलबजावणी करून ते उपक्रम विविध शाळात पोचविण्याचे काम गेली अठरा वर्ष सातत्याने करीत आहेत.विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप,विज्ञान प्रदर्शन,स्पर्धा परिक्षा क्रिडास्पर्धा, सहशालेय उपक्रम, ग्रंथ महोत्सव, शिक्षक प्रशिक्षण, मुख्याध्यापक प्रशिक्षण यांचे वाॅर्ड, विभागीय स्तरावर त्यांनी यशस्वी आयोजन केले आहेत.

      शिक्षण विभागाने 2014 साली आयोजित केलेल्या तीन दिवशीय ग्रंथ महोत्सवाची दखल केंद्र सरकारकडून दिल्ली येथे घेण्यात आली, ज्याचे सादरीकरण लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले होते. सदर महोत्सव यशस्वी व्हावा म्हणून विजय सावंत यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती.तसेच सन 2023 साली महाराष्ट्र शासनाकडून दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवातही त्यांचा सहभाग होता.

        त्यांनी गेली पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शिवधनुष्य मुख्याध्यापक, शाळा, पालक, स्वयंसेवी संस्था, व सहकारी यांच्यामार्फत उचलले आहे.

       सन 2013 साली त्यांचा " प्रकाश किरणांच्या शोधात " नावाचा कवितासंग्रह डिंपल या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आला.तर " जगण्याचे आर्त " नावाचा कवितासंग्रह प्रभा प्रकाशन, कणकवली यांच्या मार्फत सन 2021 साली प्रकाशित झाला. तसेच " सिंधुदुर्गातील आजची कविता " नावाच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला असून" ग्रंथाली " या मान्यवर संस्थेमार्फत त्यांची "साहित्याच्या पारावर " या साहित्यिक सदरात दिर्घ मुलाखत घेण्यात आलेली आहे.काही दिवाळी अंक व वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण प्रसिद्ध झालेले आहे.तसेच अनेक शाळा व वाचनालयातून त्यांनी कविता वाचनाचे कार्यक्रम केले आहेत. कुंब्रल ग्रामविकास मंडळ मुंबई या संस्थेचे सिक्रेटरी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले, तसेच दोडामार्ग तालुका विकास मंडळाचे ते सदस्य आहेत.आपला गाव कुंब्रल येथे व सावंतवाडीत मराठा समाजाच्या वसतीगृहात व कणकवली नांदगाव येथे वाचनालय सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

       विद्या परिषद,पुणे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ,मि.पा. औरंगाबाद, आंग्लभाषा औरंगाबाद येथे राज्यस्तरावर त्यांनी आपली सेवा बजावली असून पाठ्यपुस्तकातील क्युआर कोडसाठी काम केल्याबद्दल त्यांना तत्कालिक शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.एकता कल्चरलअकादमी ,मुंबई.

या संस्थेमार्फत त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल त्यांना " महात्मा ज्योतीबा फुले " पुरस्कार देऊन तर मुंबईतील काळाचौकी येथील अहिल्या शिक्षण संस्थेमार्फत त्यांना " आदर्श शिक्षक पुरस्कार " देऊन गौरविण्यात आलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today