सिंधुदुर्ग today



योगिता शेटकर यांची कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते

करुणेचा प्रवाह' काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात ऍड.देवदत्त परुळेकर यांचे प्रतिपादन

कवी अजय कांडर यांच्या हस्ते संग्रहाचे प्रकाशन: मधुकर मातोंडकर, प्रा.वैभव साटम यांची उपस्थिती

सावंतवाडी/ऋषिकेश मोरजकर

       कवयित्री योगिता शेटकर यांच्या 'करुणेचा प्रवाह' या संग्रहाचे शीर्षक फार अप्रतिम आहे.जगात करुणे सारखी सर्वात सुंदर गोष्ट कोणती नाही. 'करुणेचा प्रवाह' या काव्यसंग्रहातील कविता समग्र जगण्याचे भान व्यक्त करते. यामुळेच योगिता शेटकर हिचे मराठी कवितेतील भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यास ऍड. देवदत्त परुळेकर यांनी केले.

    कवयित्री योगिता शेटकर यांच्या 'करुणेचा प्रवाह' या ग्लोबल बुक हाऊस मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते झाले. ऍड.परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ललित लेखक प्रा. वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ऍड. परुळेकर यांनी योगिता यांनी संत साहित्याचा अभ्यास करावा विशेषत: नामदेव आणि जनाबाई यांच्या अभंगातून त्यांना खूप गोष्टी लेखनासाठी शिकता येतील असा मोलाचा सल्लाही दिला.यावेळी विवेकानंद जोशी,प्रकाश शेटकर, प्रतीक्षा शेटकर आदी उपस्थित होते.

     कवी कांडर म्हणाले, 'करुणेचा प्रवाह' संग्रहातील कविता वाचल्यावर योगिता शेटकर यांना कमी वयात जगण्याची मोठी समज असल्याचे जाणवत राहते. जगण्याची समज हीच कवितेची समज असते. त्यांची कविता सर्व भेद ओलांडून समग्र माणसाचा विचार करते. अर्थात अशीच कविता पुढे जात असते. एका विशिष्ट विचारात आणि वर्तुळात राहिल्यास कवितेलाही साचलेपणा येतो. या साचलेपणाची लक्षण योगिता यांच्या कवितेत दिसत नाहीत. हे या कवितेचे महत्त्वाचे मोल आहे. आज लिहिल्या जाणाऱ्या कोकणातील कविते योगिता यांच्या कवितेची वाट स्वतंत्र असून सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिल्यास त्या अधिक प्रगल्भ कविता लिहू शकतात.

   प्रा.साटम म्हणाले, समाज साहित्य प्रतिष्ठानच्या कवितेच्या चळवळीतून योगिता यांच्या कवितेची खरी ओळख झाली. अल्प कालावधीत गुणवत्ता पूर्ण कविता लिहून त्यांनी कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यापर्यंतची वाटचाल केली. याचे कौतुकच करायला पाहिजे. ज्या वयात मुलं सोशल मीडियावर दिवस घालवतात त्या वयात योगिता सोशल मीडियापासून दूर राहून वाचन आणि कविता लेखन करतात.ही इतर नव्या कवींसाठी आदर्श अशी घटना आहे. त्यांची कविता माणसाच्या सुखदुःखाविषयी बोलते.समाजातील अनिष्ट गोष्टी बदल त्यांच्या मनात चीड आहे. आणि याच अनुभवाची त्या कविता बनवतात. यावरून त्या कुठल्या वर्गाच्या बाजूने आहेत हे स्पष्ट होते.

  श्री मातोंडकर म्हणाले, योगिता यांच्या आजवरच्या कविता वाटचालीचा मी साक्षीदार आहे. त्यांनी निष्ठेने कविता लेखन चालू ठेवले आहे. शोषित वर्गाबद्दलची त्यांची मनात आस्था  आहे. जात आणि धर्माबद्दलचा भेद या विरोधातील चीड त्यांच्या कवितेत व्यक्त होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची कविता आजच्या काळाची कविता आहे. त्यांच्या कवितेचं भविष्य उज्वल असून त्यांनी मराठी कवितेच्या चळवळीला जोडून राहत काव्य लेखन करावे!

     विवेकानंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश शेटकर यांनी स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today