सिंधुदुर्ग today

  


.................................

'सिंधुदुर्ग टुडे'  या माध्यमातून गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेतील आजच्या मानकरी आहेत नांदगाव प्राथमिक शाळा एक मधील गुणवंत शिक्षिका प्रतिमा पोकळे!

.......................................


विद्यार्थ्यांमध्ये संगीताची कला जोपासणाऱ्या अष्टकलापटू शिक्षिका प्रतिमा पोकळे.


    🏵️ गुरू माझी माऊली 🏵️


सिंधुदुर्ग / ऋषिकेश मोरजकर

   जीवन हे विविध कलानी भरलेलं असतं. मात्र त्याची जाणीव विद्यार्थी दशतच व्हायला हवी. अशी जाणीव झाली की शिक्षणाबरोबरच माणसाचा भविष्यात सर्वांगीण विकास घडतो आणि ते व्यक्तिमत्व लोकांसमोर येते. विद्यार्थ्यांमधील कला विकासाची अशी जाणीव करून देणाऱ्या आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड जोपासणाऱ्या ज्याला आपण अष्टकलापटू म्हणू शकतो अशा गुणवंत शिक्षिका प्रतिमा पोकळे! सध्या त्या नांदगाव प्राथमिक शाळा एक येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून आजवर त्यांची ज्या ज्या शाळेत नेमणूक झाली त्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

     प्रतिमा पोकळे यांची शैक्षणिक कारकीर्द 2000 मध्ये सुरू झाली. शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर अगदी प्रारंभी पासूनच त्यांनी मुलांमधील शिक्षणापलीकडील विश्व शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या विद्यार्थ्यांनी ज्ञानदान घेतले ती सर्वच मुले चौफेर विचार करू लागली. यासंदर्भात त्या म्हणतात, आपल्यातील कला गुण विद्यार्थ्यांना देणे आणि त्यांचा तसा व्यक्तिमत्व विकास घडविणे हेही महत्त्वाचे शिक्षण असते. असे शिक्षण विद्यार्थ्यांना जेव्हा मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांना पुस्तकी शिक्षणाचेही महत्व कळते.म्हणूनच मी ज्या ज्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत राहिली त्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक दृष्ट्याही सक्षम बनविण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविणे, शाळेचा कायापालट करणे, शाळेचा विकास घडवून आणणे यासाठी विविध उपक्रम , सांस्कृतिक कार्यक्रम, प्रकल्प त्याच प्रमाणे दर्जेदार अध्ययन अध्यापन व  शैक्षणिक उठावांतर्गत ग्रामस्थांकडून देणगी मिळविणे आणि शाळेची प्रगती साधने हा त्यांचा  ध्यास होता. त्यातूनच त्यांनी शाळेचा आलेख उंचावतच ठेवला .

      प्रतिमा चंद्रशेखर पोकळे यांची  कणकवली तालुक्यातील शैक्षणिक कारकीर्द सन 2000 पासून सुरू झाली. सुरुवातीची शाळा अगदी दुर्गम भागातील. सावडाव खलांत्रीवाडी. या शाळेत त्यांनी अमूल्य अशी भरघोस  कामगिरी केली .सावडाव खलांत्री  शाळेनंतर त्यांची बिडवाडी - हुंबरणे या शाळेत नेमणूक झाली.तेथेही मुख्याध्यापक कार्यभार सांभाळत दोन वर्ग सांभाळून अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी त्यांनी केली. नंतर त्यांची पदवीधर शिक्षका म्हणून जि. प. नांदगाव शाळा नंबर १ येथे नेमणूक झाली .

      खरं पाहता सावडाव खलांत्री मध्ये पटसंख्या अभावी आणि शिक्षक नसल्याने बंद होणारी शाळा त्यांनी पटसंख्या वाढवून जादाही शिक्षक मिळविले आणि शाळा कार्यरत ठेवली .

      शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविणे, शाळेचा कायापालट करणे, शाळेचा विकास घडवून आणणे यासाठी विविध उपक्रम , सांस्कृतिक कार्यक्रम, प्रकल्प त्याच प्रमाणे दर्जेदार अध्ययन अध्यापन व  शैक्षणिक उठावांतर्गत ग्रामस्थांकडून देणगी मिळविणे आणि शाळेची प्रगती साधने हा त्यांचा  ध्यास होता. त्यातूनच त्यांनी शाळेचा आलेख उंचावतच ठेवला .यावेळी त्यांना त्या वेळचे मुख्याध्यापक सुनील ठाकूर व पदवीधर शिक्षक चंद्रशेखर पोकळे यांचेही खूप मोलाचे सहकार्य लाभले .

      यानंतर प्रमोशनने पदवीधर म्हणून त्यांची सध्याची शाळा जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदगाव नंबर एक येथे नेमणूक झाली .येथेही शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी भरघोस अशी  कामगिरी त्यांनी केली आहे .त्या स्वतः हार्मोनियम वादन व कीबोर्ड वादन करतात व मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण करतात .मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना गायन, वादन , नृत्य, नाट्य सांस्कृतिक ठेवा जपण्याचं अमूल्य असं कार्य त्यांच्याकडून होत आहे. शालेय क्रीडा स्पर्धामध्ये देशभक्ती गीत गायन व नृत्य यामध्ये आपल्या शाळेतील मुलांचा सहभाग असावा व ती मुले अग्रेसर असावीत यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सातत्यपूर्ण चालूच असतात. शिवाय कुठे देशभक्ती गीत गायन स्पर्धांचे आयोजन असेल तर मुलांचा त्यामध्ये त्या चांगला सहभाग नोंदवितात.

        कोरोना कालावधीत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करून अनेक शैक्षणिक व्हिडिओज् विशेष करून गणित व इंग्रजी बरोबरच , कला , विज्ञान व इतरही विषयांचे आवश्यकतेनुसार अनेक व्हिडिओ निर्मिती करून ते प्रसारीत केले.ह्या व्हिडिओंचा फक्त नांदगाव नंबर एक शाळेतीलच मुलांना नाही तर सिंधुदुर्गातील आणि सिंधुदुर्ग बाहेरील अनेक मुलांना फायदा झाला.आजपर्यंत व्हिडिओ निर्मितीचा कार्यक्रम चालूच आहे .अध्यापनामध्ये पाठ्यांशाला अनुसरून स्वतःला आलेले अनुभव कथन करणे, समाजातील घटना कथन करणे त्याशिवाय कथाकथनातून अध्ययन अनुभव देणे असा एक त्यांच्या अध्यापनाचा वेगळा ठसा मुलांच्या मनावर उमटतो .

      हुशार मुले,होतकरू मुले  मार्गदर्शनाने पुढे जातच असतात ते कुठे थांबत नाहीत. मात्र आपण मागे राहणाऱ्या मुलांसाठी आहोत. ज्यांना लेखन वाचन जमत नाही जी मुले मागे मागे राहतात त्यांच्यासाठी आपण आहोत आणि त्यांना जीवन शिक्षण देणे, मूल्य शिक्षण देणे शिक्षण प्रवाहात आणणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं त्या समजतात. हसा ,खेळा , नाचा , गात रहा अभ्यासही करा मात्र शिस्त पाळा हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे .

    प्रतिमा पोकळे या प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत Yoga  Instructor Level 4 ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून समाजातील महिलांचे आरोग्य चांगलं राहिल पाहिजे म्हणून त्यांनी  दोन ते तीन वर्ष स्वतःच्या घरी योगाचे मोफत क्लासेस चालविले. परिसरातील अनेक महिलांनी याचा लाभ घेतला .तसेच लहानपणापासून व्यायामाचे महत्त्व मुलांना पटावं, योगा करण्याची सवय लागावी म्हणून परिसरातील सर्व मुलांचे दोन महिने मोफत योगसंदर्भात बालकक्षा चालविली .योग शिक्षक म्हणूनही त्या शाळेत आपली कामगिरी उत्तमपणे पार पाडीत आहेत .

        उत्कर्षा अंतर्गत किशोरवयीन मुलींना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना निर्भीड बनविणे आणि त्यांनी उंच भरारी घेणे या संदर्भातही त्यांच मोलाच मार्गदर्शन असतं. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत सर्व छोट्या छोट्या बाबींचाही समावेश केलेला असं त्यांनी स्वतः लिहिलेलं उत्कर्षा गीत मुलींना चांगलंच मार्गदर्शक ठरतं आहे.हे गीत जिल्ह्याच्या उत्कर्षा प्रशिक्षण सादरीकरणांमध्ये समाविष्ट केले गेले. दाखविले गेले!

    या त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये  नांदगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये तसेच नांदगाव केंद्रबल गटाच्या केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर व शाळेचे मुख्याध्यापक सुहास सावंत व इतर सर्व शिक्षक वृंदांचे वेळोवेळी त्यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today