सिंधुदुर्ग today

 


.......................................

सिंधुदुर्ग टुडे' या मीडियाच्या माध्यमातून आम्ही गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका चालू केली आहे. या मालिकेतील यावेळचे मानकरी आहेत विद्यार्थ्यांची साहित्यिक जडणघडण अनुकरणात आणणारे नडगिवे प्रा.शाळेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे शिक्षक संदीप हरी कदम!

.......................................


संदीप हरी कदम विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष साहित्यिक जडघडण घडविणारे शिक्षक

   गुरू माझी माऊली

सिंधुदुर्ग/ऋषिकेश मोरजकर

        शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न करताना मुलांच्या उपजत गुणांना विकसित करणे महत्वाचे असते.असाच शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा गुरू बनु शकतो.याला साजेस काम करणारे अपवादाने जे शिक्षक आहेत, त्यातील अग्रक्रमाने ज्यांच आपल्याला नाव  घ्याव लागेल ते म्हणजे सध्या जि.प. प्रा.शाळा नडगिवे नं.१ (कणकवली) या शाळेत कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक संदीप हरी कदम होय! त्यांनी विद्यार्थ्यांमधील साहित्यिक गुणवत्ता विकसित करून सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात एक इतिहास घडविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध झालेल्या विद्यार्थ्यांच्या कवितासंग्रहास पुणे येथील बालकुमार साहित्य संस्थेचा प्रतिष्ठित असा पुरस्कारही  मिळाला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष साहित्यिक जडघडण घडविणाऱ्या या गुणी शिक्षकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!

    संदीप हरी कदम हे शिक्षक म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. ज्या शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक होईल तिथे क्रमिक पुस्तकी शिक्षणापलीकडे मुलांची शैक्षणिक प्रगती व्हायला हवी असा ध्यास घेऊन ते सतत कार्यरत असतात. तिवरे प्रा.शाळेतील मुलांच्या साहित्यिक जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध करून शिक्षणापलीकडचे विद्यार्थ्यांचे जग कसे विकसित करायचे असते हे दाखवून दिले आणि विद्यार्थ्यांचीही जगण्याची दृष्टी विकसित केली.यामुळे तिवरे प्राथमिक शाळा नंबर एकचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर झाले. या कामी त्यांना तिवरे शाळा समिती अध्यक्ष श्री रामदास आंबेलकर ,केंद्रप्रमुख मान.सौ.जुहिली सावंत, मुख्याध्यापक श्री विजय शिरसाट,शिक्षक- श्री हेमंत राणे विजय मेस्त्री,तिवरे सर्व ग्रामस्थ व सहकारी यांनी केलेले सहकार्य महत्त्वपूर्ण होते असेही श्री कदम आवर्जून सांगतात. यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो!      

              'ज्ञानसेवा तू साफल्यम्'...शिक्षणाच्या या पवित्र क्षेत्रात विद्यार्थी प्रगतीचे उद्दात ध्येय उराशी बाळगून सतत नाविन्याचा ध्यास जपत; ज्ञान,

विज्ञान,तंत्रज्ञान,पर्यावरण,कला,क्रीडा,संस्कार व सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालत,शालेय शिक्षणात विविधांगी व प्रयोगशील उपक्रम राबविणारे,मुलांत रमणारे,कष्टाळू वप्रामाणिक,सेवाभावी,कलासंपन, साहित्यिक व आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे संदीप हरी कदम! 

मूळचे 'जानवली' या निसर्गसंपदा लाभलेल्या गावचे ते राहणारे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जानवली नं.१ या प्रशालेत तर माध्यमिक शिक्षण एस्. एम्. हायस्कूल कणकवली आणि डी.एड्चे शिक्षण कै.सौ.इंगेट्राऊट अध्यापक विद्यालय कणकवली या ठिकाणी झाले.प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण  घेत आपले शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले.शाळा मुटाट नं.१ ,ता-देवगड या प्राथमिक शाळेत  १९९४ साली त्यांच्या सेवेची सुरवात झाली. ग्रामीण भागातील या शाळेत १३ वर्ष अत्यंत प्रामाणिक सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेतले. शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ५ विद्यार्थी पात्र घडविले. शैक्षणिक उठावांतर्गत शालेय रंगरंगोटी, शालेय बाग,बसण्याचे लाकडी बाक,शैक्षणिक चित्रे, लॅपटॉप या सारख्या सुविधा पूर्ण केल्या.सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेतून दत्तक मुली,बालआनंद मेळावा,गावातील तीन शाळांचे एकत्र वार्षिक स्नेहसंमेलन असे उपक्रम राबविले.॥असाध्य ते साध्य करता सायास,   कारण अभ्यास तुका म्हणे॥ याप्रमाणे शैक्षणिक गुणवत्तेच्या ध्यासासाठी काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न ! देवगड तालुक्यातील दुसरी शाळा शिरगाव राकसवाडी, इयत्ता १ ते ४ च्या या प्राथमिक  शाळेत शैक्षणिक उठावांतर्गत भव्य- दिव्य आरसीसी प्रवेशद्वार, कंपाउंड वॉल, पाण्याची सुविधा, शालेय प्रवेशद्वार, संगणक, स्पीकर व्यवस्था, बैठे बाक सुविधा, शैक्षणिक उठावांतर्गत प्राप्त केल्या.बाल - कला-क्रीडा महोत्सवात या शाळेचे अनेक विद्यार्थी चमकवले. शाळेचा शिष्यवृत्ती निकाल १००% टक्के लावला. 'एक घास चिऊचा' यासारख्या उपक्रमाद्वारे प्राणी मात्रांबद्दलचे प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केले.शालेय परसबाग निर्माण केली. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ही शाळा तालुका, जिल्ह्यात सतत २ वर्ष प्रथम आली. राज्यस्तरावर या शाळेतील गुणवत्तेचं  कौतुक केले. पुढे प्रशासकीय  बदलीने त्यांची नेमणूक कणकवली तालुक्यातील शाळा तिवरे खालचीवाडी या ठिकाणी झाली. या शाळेत शैक्षणिक उपक्रमांसोबत साहित्य क्षेत्रात या शाळेचा नावलौकिक राज्यस्तरावर नेला. या शाळेतील गुणवंत बालकवींचा ४ मे २०२२ रोजी 'विद्यार्थ्यांच्या बालकविता' हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. राज्यस्तरीय कवी संमेलनात सहभाग घेऊन या शाळेची 'बालकवींची शाळा' अशी ओळख करून दिली. 'ज्ञानवेध'नावाचे हस्तलिखित सातत्याने ९ वर्ष प्रकाशित केले. नवोदय परीक्षेत ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.  सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत २४विद्यार्थी,डिजिटल शाळा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा,निबंध स्पर्धांमध्ये तालुकास्तरावर विद्यार्थ्यांनी यश प्राप्त  केले. 'आकाशवाणी' वरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कविता सादर झाल्या. सेंद्रिय परसबाग स्पर्धेत तालुकास्तरावर सतत २ वर्ष व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून दिला. विज्ञान प्रदर्शनात 'स्वच्छता' मॉडेलने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून केला. सामाजिक उपक्रम राबवत पूरग्रस्तांना मदत करणे,गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे,सेवांगण  मालवण स्पर्धा सहभाग, 'प्रज्ञांगण तळेरेच्या' विविध स्पर्धांमध्ये सहभाग. असे उपक्रम या शाळेत राबवले.कोरोना काळात कोविड योध्यांना पत्र लिहिले.

   आदर्शाचा एक नवा वसा या शाळेत त्यांनी निर्माण केला. 'ईथे ओशाळला मृत्यू'या ऐतिहासिक नाटकात यशस्वी  भूमिका केली.  तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरीय  प्रशिक्षणे केली.विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत.नुकतेच करुळ भोरपी व तिवरे खालचीवाडी शाळेतील विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत घेतली आहे. 'प्रकट महाराष्ट्र' या वृत्त वाहिनीचा 'उपक्रमशील शाळा'या पुरस्काराने तिवरे शाळा गौरविली गेली.या प्रवासात शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. शिक्षणाचा वसा व ध्यास जपत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र तळमळीने कार्य करणाऱ्या या अष्टपैलू  व्यक्तीमत्वाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today