सिंधुदुर्ग today
बावशीत उधळला महिलांनी श्रावण रंग
बावशी सामाजिक प्रतिष्ठानच्या महिलांच्या 'श्रावण रंग' सांस्कृतिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतून महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
ऍड.प्राजक्ता शिंदे, ऍड.मेघना सावंत यांचेही महिलांना मार्गदर्शन
कणकवली/प्रतिनिधी
श्रावण आणि महिला यांचे विशेष नाते आहे. हे नाते अधोरेखित झाले ते बावशी येथे आयोजित करण्यात आलेल्या "श्रावण रंग" या महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून! या कार्यक्रमात फुगडी, उखाणी, गाणी आणि लेझीम नृत्य महिलांनी सादर करून अक्षरश: श्रावण रंग उधळला! बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमात ऍड.प्राजक्ता शिंदे आणि ऍड. मेघना सावंत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
बावशी - तोंडवली पंचक्रोशीतून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात काबाडकष्ट करून मुलाला उच्चशिक्षित बनविणाऱ्या बावशी शेळीचीवाडी येथील रसिका मांडवकर सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ भाऊ रांबाडे, सेवाभावी व्यवसायिक गणेश बांदिवडेकर यांचा शाल भेटवस्तू आणि ग्रंथ देऊन ऍड.प्राजक्ता शिंदे आणि ऍड. मेघना सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बावशी प्रतिष्ठानचे संस्थापक मार्गदर्शक कवी अजय कांडर, विद्यमान अध्यक्ष विलास कांडर, कार्यवाह समीर मयेकर, सहकार्यवाह संजय राणे, उपाध्यक्ष मोहन खडपे, कोषाध्यक्ष शिवराम गुरव, सदस्य विजय कांडर, नारायण मरये, भरत कांडर, कल्पना कांडर, सुवर्णा राणे, मनीषा राणे, समीक्षा मयेकर, सरपंच मनाली गुरव ग्रामपंचायत सदस्य दिनेश कांडर,मनश्री कांडर, सौ.गावडे, प्रसिद्ध बुवा उद्धव कांडर, तंटामुक्ती माजी अध्यक्ष हेमंत कांडर, माजी सरपंच सुप्रिया रांबाडे, शिक्षक विनायक ठाकूर, दिनेश पाटील, सीआरपी संगीता कदम, श्रीमती सावंत आदी उपस्थित होते.
ऍड.प्राजक्ता शिंदे म्हणाल्या, कष्टकरी महिलांना प्रेरणा मिळावी म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम म्हणजे महिलांना मिळालेले हक्काचे व्यासपीठ. शिक्षण कमी असले तरी चालेल पण महिलांना आत्मविश्वास हवा. आत्मविश्वास असेल तरच व्यक्तिमत्व विकास त्यांचा होऊ शकतो. यासाठी असे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले गेले पाहिजेत. शेतात राबणाऱ्या महिलांचे आज गुणदर्शन झाले आणि खूप समाधान मिळाले. गावपातळीवरच्या राजकारणापासून दूर राहून महिलांनी आपला आणि आपल्या मुलांचा विकास साधायला पाहिजे. यात मुलांच्या उच्च शिक्षणाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. असे सांगतानाच ऍड.शिंदे यांनी शेतकरी कुटुंब ते एक यशस्वी वकील इथपर्यंतचा आपला प्रवासही कथन केला.
ऍड.मेघना सावंत म्हणाल्या, बावशी सारख्या खेडेगावात महिलांसाठी एवढा देखना कार्यक्रम आयोजित केला जातो याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आज महिला पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. परंतु ग्रामीण भागातील महिलांना आपल्या संरक्षणार्थ कोणता कायदा आहे याची माहिती नाही. महिलांवर अत्याचार होत असेल तर कायद्याने त्यांना संरक्षण मिळतं. मात्र यासाठी महिलांनी पुढे यायला पाहिजे. ग्रामीण भागातील महिला अजूनही घरगुती हिंसाचाराला बळी पडतात.यासाठी त्यांच्यात प्रबोधन होण्याची गरज आहे आणि असे प्रबोधनाचे काम या श्रावण रंग कार्यक्रमातुन केले जात आहे हेच या कार्यक्रमाचे खरे यश आहे.
सुरेश रांबाडे म्हणाले, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मांडवकर यांच्यासारख्या कष्टकरी महिलेचा गौरव होतो, यातूनच या प्रतिष्ठानला भविष्यात कुठलं काम करायचं आहे हे स्पष्ट होतं. या प्रतिष्ठांच्या पुढील सर्व कामांमध्ये आमच्या शेळीचेवाडी मधील सर्व महिलांचं पाठबळ असेल! यावेळी बुवा कांडर यांनीही विचार व्यक्त केले.
दिनेश पाटील यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कांडर यांनी केले. मनीषा राणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कल्पना कांडर यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा