सिंधुदुर्ग Today
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची जामीनावर मुक्तता
कणकवली/प्रतिनिधी
आपसात भांडणा दरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.
याप्रकरणी थोडक्यात हकीकत अशी कि,
फिर्यादी निलेश लक्ष्मण धोत्रे, रा. कलमठ- कणकवली यांनी दिलेली फिर्याद नुसार, 21मार्च 2023 रोजी फिर्यादीचे वडील लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे व त्यांचे सोबत ट्रॅक्टरवर मदतीला गेलेला संजय रामचंद्र माने यांच्यात कणकवली मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुपर चिकन सेंटरच्या समोर ट्रॅक्टरमध्ये चिकन सेंटर मधील घाण भरण्यासाठी ट्रॅक्टर थांबलेला असताना रात्री 9.00 वा. च्या सुमारास ट्रॅक्टर चालविण्याचे कारणावरुन त्या दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे यांनी तेथेच ट्रॅक्टर ठेवून ते दोघेही रस्त्यावरून पायी चालत जात असताना संजय माने याने लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे यांना रागाच्या भरात जोरात धक्का दिला. त्यामुळे ते डांबरी रस्त्यावर पडल्यामुळे त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली.तेव्हा त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे ऍडमिट केले.लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे यांचेवर प्राथमिक उपचार सुरु होते. परंतु लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे हे बेशुध्दावस्थेत होते. ते काही बोलत नव्हते. किंवा कोणतीही हालचाल करत नव्हते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे नेण्यास सांगितल्याने. लक्ष्मण धोत्रे यांना जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे नेण्यात आले व तद्नंतर बांबोळी, गोवा येथे नेण्यात आले. घटना घडल्यापासून लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे हे कोमामध्ये गेलेले होते. व दिनांक ११ जुलै २०२३ रोजी मयत झाले. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याचे विरुद्ध कणकवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.१२४/२०२३ भा.द.वि.कलम ३०४ व ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी याला दिनांक १६ जुलै २०२३ रोजी अटक करून कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याचेवतीने ओरोस येथील मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओरोस यांचे कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे.भारुका यांनी आरोपी याची रक्कम रुपये पंधरा हजार च्या जामिनावर मुक्तता करण्याचे आज आदेश पारित केले. संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याच्या वतीने अँड. प्राजक्ता म. शिंदे यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा