सिंधुदुर्ग Today न्यूज
बावशी सामाजिक संस्थेच्या बोधचिन्हाचे उद्या अनावरण
इस्लामपूर येथील चित्रकार प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेने साकारले अर्थपूर्ण बोधचिन्ह
कणकवली/प्रतिनिधी
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान या संस्थेचे सांगली इस्लामपूर येथील प्रतिभावंत तरुण चित्रकार प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे अर्थपूर्ण बोधचिन्ह साकारले आहे. त्याचा अनावर कार्यक्रम बावशी येथे शनिवार 19 रोजी स. ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.
"विवेकाने जगू हाच आमचा ध्यास- जात धर्म ओलांडून गावचा विकास" असं बोधवाक्य बावशी सामाजिक प्रतिष्ठानचे असून या बोधवाक्याला साजेसे अर्थपूर्ण हे बोधचिन्ह चित्रकार पाटील यांनी तयार केले आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची प्रतिमा एकत्रित करून हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. महात्मा गांधींनी शांततेचा संदेश दिला आणि छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांनी खेडोपाड्यासह सर्व स्तरातील अस्पृश्यता निवारण्याचे महान कार्य केले. आज प्रत्येक गावाला या महापुरुषांच्या अशा विचारांची खरी गरज आहे त्यामुळेच त्यांच्या प्रतिमेचे हे बोधचिन्ह तयार करण्यात आले असल्याची माहिती बावशी सामाजिक प्रतिष्ठानकडून देण्यात आली.
सामाजिक - सांस्कृतिक कार्यकर्ते, कवी आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बावशी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कांडर आणि कार्यवाह समीर मयेकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा