सिंधुदुर्ग Today
उद्याच्या पिढीला आपण योग्य शिक्षण दिले नाही तर ती आपल्याला माफ करणार नाही
बावशी शिक्षक गौरव कार्यक्रमात कवी मधुकर मातोंडकर यांचे स्पष्ट प्रतिपादन
बावशी सामाजिक प्रतिष्ठानतर्फे शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भव्य गौरव सोहळा, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
ऋषिकेश मोरजकर|कणकवली
उद्याच्या पिढीला आपण योग्य शिक्षण दिलं नाही तर ती आपल्याला माफ करणार नाही.त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या ग्रामीण भागातील वर्गानेही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आणि शिक्षकांनी अशा मुलांची गुणवत्ता वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. या पार्श्वभूमीवर बावशी येथे आयोजित करण्यात आलेला हा शिक्षक गौरव सोहळा प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते कवी मधुकर मातोंडकर यांनी बावशी येथे केले.
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे कवी मातोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात बोलताना मातोंडकर यांनी बावशी गावी सामाजिक सांस्कृतिक चळवळ सुरू करून या गावाने एक नवा चेहरा गावाला देण्याचा प्रयत्न चालविला आहे. कवी अजय कांडर यांच्यासारखा मराठी साहित्यातील प्रतिष्ठित व्यक्तीने हे प्रतिष्ठान सुरू केले. त्यामुळे या चळवळीचं भवितव्य उज्वल आहे असेही आग्रहाने सांगितले.यावेळी बावशी शाळेतील शिक्षक विनोद ठाकूर, दिनेश पाटील, अंगणवाडी सेविका स्वप्नरेखा एकनाथ कांडर,सहायक नर्मदा नामदेव मर्ये, राजश्री शिवराम गुरव यांचा शाल, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू आणि ग्रंथ देऊन मातोंडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक मार्गदर्शक कवी अजय कांडर, अध्यक्ष विलास कांडर, उपाध्यक्ष मोहन खडपे, कार्यवाह समीर मयेकर, सहकार्य संजय राणे, कोषाध्यक्ष शिवराम गुरव, सुवर्ण राणे, मनीषा राणे, श्रीकृष्ण नानचे तसेच दर्पण सांस्कृतिक चळवळीचे माजी अध्यक्ष किशोर कदम, नेहा कदम,विजय कांडर, पंढरी सावंत, ग्रा. प.सदस्य दिनेश कांडर, वनिता कांडर, सुहासिनी कांडर, सुनिता कांडर आदी उपस्थित होते.
अजय कांडर म्हणाले, आपला गाव आपली भूमी यावर आपण प्रेम करायला पाहिजे. त्यातूनच बावशी येथे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक चळवळ सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने गावच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि सांस्कृतिक विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. आजची मुलं जर उच्च शिक्षण घेत नसतील तर ते अपयश गावातील आजच्या पिढीचे आहे. चांगली मुलं चांगली शिकायची असतील तर त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा द्यायला हवी. त्यामुळेच या गावातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे. गावातील शिक्षक उत्तम शिकविण्याचे काम करत असून त्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करायला हवे.
यावेळी विनोद ठाकूर दिनेश पाटील, श्रीकृष्ण नानचे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले. विलास कांडर, मोहन खडपे, संजय राणे, शिवराम गुरव, सुवर्णा राणे,मनीषा राणे यांनी ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. समीर मयेकर यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा