सिंधुदुर्ग Today

 


अण्णा भाऊ साठे यांना एका जातीत बांधू नका

शिवाजी विद्यापीठातील परिसंवाद अध्यक्षपदावरून बोलताना कवी अजय कांडर यांचे परखड मत

प्रा.सोमनाथ कदम, प्रा.डॉ.सुनीता बर्डे, प्रा.डॉ.प्रकाश नाईक, प्रा.निरंजन फरांदे आदी अभ्यासकांचाही सहभाग

कणकवली/ऋषिकेश मोरजकर
    अण्णा भाऊ साठे यांचे लेेखन जगण्याचे समग्र भान देते.मराठी साहित्यात शोषित वर्गाच्या साहित्याचा पाया रचणारा हा साहित्यिक गरिबीतही अतिशय स्वाभिमानाने जगला.म्हणूनच त्यांच्या लेखनात स्वाभिमान जपणाऱ्या लढावू व्यक्तिरेखा येतात. अशा या महान लेखकाला एका जातीत बांधू नका.जातीअंत व्हावा असे म्हणणारे लेखकही आज स्वत:च्या जातीच्या वर्तुळातच अडकलेले दिसतात.
असे परखड मत शिवाजी विद्यापीठात झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी व्यक्त केले.
     कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ, मराठी विभाग आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 'अण्णा भाऊ साठे यांचे वाङमय  पुनर्शोधाच्या दिशा' या विषयावरील परिसंवाद कवी कांडर यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्य शासनाच्या अण्णा भाऊ साठे चरित्र, ग्रंथ प्रकाशन समितीचे सदस्य प्रा. सोमनाथ कदम, प्रा.सुनीता बर्डे , प्रा. प्रकाश नाईक, प्रा. निरंजन फरांदे यांना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी विद्यापीठाचे अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे संचालक डॉ.रणधीर शिंदे,मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे,डॉ.शरद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
  श्री कांडर म्हणाले, कोणत्याही एका जातीच्या चौकटीत अण्णाभाऊना उभे केले जाऊ नये. ते आंबेडकरी विचाराचे होते तसा त्यांच्यावर लेनिनच्या विचाराचाही प्रभाव होता. म्हणूनच ते कम्युनिस्ट कार्यकर्ते होते.त्यांनी भटक्या विमुक्तांचे दुःख आपल्या साहित्यातून चित्रित केले.त्यांनी कथा,  कादंबरी, पोवाडे, लावण्या, नाटक, वगनाट्य अशा साहित्य प्रकारातून  विपुल असे लेखन केले .नारायण सुर्वे ,वामनदादा  कर्डक अण्णाभाऊ साठे या तिन्ही व्यक्तींनी विद्यापीठाची पायरी जरी ओलांडली नसली तरी आज या तिघांच्या साहित्यावर अनेक विद्यापीठात संशोधन होत आहे.कारण ते विचाराने मोठे झाले.
      प्रा.डॉ.कदम म्हणाले, गावगाड्यातील जाती संघर्ष आणि जाती समन्वय अत्यंत वास्तव पद्धतीने अण्णा भाऊ साठे यांनी लेखनात रेखाटले आहे. एका बाजूला जातीं जमातीचे अस्तित्व दाखवताना दुसऱ्या बाजूला जाती पल्याड असलेल्या माणुसकीचे दर्शनही अण्णा भाऊंच्या साहित्यातील जात जाणिवातून स्पष्ट होते.
भुक,भय,दारिद्र्य ,विद्रोह ,स्त्री प्रतिष्ठा आणि  संविधानातील मूल्यांचा जागर अण्णा भाऊंच्या साहित्यातून होतो.हे आजच्या काळात फार महत्वाचे आहे.म्हणून हा लेखक काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे.
    प्रा.डॉ.प्रकाश नाईक यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा तपशीलवार आढावा घेतला. प्रा.डॉ.सुनीता बर्डे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील "स्त्री संघर्ष" यासंदर्भात मांडणी केली. तर प्रा.डॉ.फरांदे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि वर्ग संघर्ष या संदर्भात विचार व्यक्त केले.
     कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक वर्ग आणि विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी  उपस्थित होते. प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.डॉ.नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले !



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today