सिंधुदुर्ग Today न्यूज

 


'सारेच पुरुष नसतात बदनाम'ने आवाजी स्त्रीवादाला धक्काच दिला

'सारेच पुरुष नसतात बदनाम' काव्यसंग्रहावरील चर्चासत्रात समीक्षक प्राचार्य शोभा नाईक यांचे परखड प्रतिपादन

नाथ पै सेवांगणतर्फे मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन


कणकवली/प्रतिनिधी

    'सारेच पुरुष नसतात बदनाम' या १९ कवयित्रींच्या प्रातिनिधी काव्यसंग्रहाने आवाजी  स्त्रीवादाला धक्काच दिला आहे. या संग्रहावरील चर्चासत्राने सत्तर नंतर पाश्चिमात्य स्त्रीवादाच्या मागे जात मराठीत होणाऱ्या मांडणीला  छेद देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.त्यामुळे हे चर्चासत्र खूप काळ स्मरणात राहील.चर्चासत्र आयोजनामागील भूमिकेमुळे स्त्रीवादावर आजवर झालेल्या चर्चासत्रांसमोर हे चर्चसत्र निश्चितच उजवे ठरले आहे असे स्पष्ट प्रतिपादन नामवंत समीक्षक डॉ. शोभा नाईक यांनी केले.

    बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 'सारेच पुरुष नसतात बदनाम ' या कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहावरील हे चर्चासत्र डॉ.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाथ पै  सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, कवी अजय कांडर, समीक्षक प्रा. संजीवनी पाटील, कवयित्री अंजली ढमाळ आणि लेखक वैभव साटम यांच्या सहभागाने सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य नाईक यांनी समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि त्यांचे सहकारी अतिशय विचारपूर्वक कार्यक्रम आयोजित करत असतात. याचीच फलश्रुती म्हणजे हे चर्चासत्र होय!

ठरावीक साच्यातच राहण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला उभं राहताना पाठबळ पुरवलं त्या पुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे नैतिकतेतच बसतं. हेही या चर्चासत्रातून स्पष्ट झाले असल्याचे आग्रहाने सांगितले. यावेळी सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, मंगल परुळेकर, समाज साहित्य संघटनेच्या पदाधिकारी मनीषा पाटील, प्रमिता तांबे, प्रियदर्शनी पारकर, ऍड मेघना सावंत आदी उपस्थित होते.

         ऍड.परुळेकर म्हणाले,संत स्त्रियांच्या रचनांची आठवण अशा चर्चासत्रा वेळी आपल्याला काढावीच लागेल संत स्त्रियांनी त्या काळात दाखवलेलं धाडस आणि  त्यांना तेव्हाच्या संतांनी  पुरवलेले पाठबळ हे आपल्याला विसरुन चालणार नाही. या विचाराच्याच केंद्रस्थानी 'सारेच पुरुष नसतात बदना' मधील सर्व 19 कवयित्रींच्या कविता आहेत. याबद्दल या संग्रहाचे संपादक अजय कांडर आणि त्यांचे सहकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. प्रा.पाटील म्हणाल्या,स्त्री-पुरुष नात्यांच्या पार्श्वभूमीवर 'सारेच पुरुष नसतात बदनाम'  या काव्यसंग्रहाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यातील अनेक कविता या स्त्री-पुरुष नात्याच्या अनेक पदरांचा उलगडा करतात. शिवाय 'पुरुष सहसा बदनाम होत नसतात' या उभ्या केल्या गेलेल्या प्रतिमेचा डोलारा हलवतात. समाज पुरुषाच्या एका वेगळ्या प्रतिमेची मांडणी करतात. श्रीमती ढमाळ म्हणाल्या :सारेच पुरुष नसतात बदनाम' काव्यसंग्रहातील कवयित्रींनी बाप, भाऊ, पती, प्रियकर, मित्र, मुलगा ह्या रुपांतून भेटणारा पुरुष उलगडला आहे. त्यांच्या भेदांना ओलांडून जाणारे सकारात्मक अवकाश  उलगडले आहेच. परंतु त्याही पलीकडे जाऊन महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध यांनाही व्यक्ती म्हणून, या समानतेच्या वाटेवरील सोबती म्हणून शब्दसंचितात आणलं आहे. प्रा.साटम म्हणाले,स्त्रीवादी साहित्याचा विचार करताना आपल्याला संत साहित्यापासून विचार करावा लागेल. परंतु ही कविता स्त्रीवादी विचाराला ओलांडून पुढे जाणारी आहे. म्हणून तिचे मोल मोठे आहे.कारण स्त्री आणि पुरुष अशा कक्षा न ठेवता स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही एकच वेळी आधी माणूस म्हणून बघायला शिकवते.

   यावेळी कवी अजय कांडर यांनी 'सारेच पुरुष नसतात बदनाम' ग्रंथाची संपादकीय भूमिका मांडली. यावेळी कवयित्री डॉ.योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी रुजारीओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कविसंमेलनात मनीषा शिरटावले, योगिता शेटकर, दिलीप चव्हाण, मेघना सावंत, रीना पाटील, आदींसह अनेक मान्यवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

प्रमिता तांबे आणि प्रा.प्रियदर्शनी पारकर यांनी सूत्रसंचालन केले.मेघना सावंत यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today