सिंधुदुर्ग Today न्यूज
' नानायात्रा' ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास
'नानायात्रा' ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
कणकवली/प्रतिनिधी
गावच्या परिवर्तनासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते.गोविंद तथा नाना चव्हाण यांनी साठ वर्षांपूर्वी गाव परिवर्तनाचा ध्यास घेतल्यामुळेच त्यांच्या स्मृती ग्रंथरूपात जतन करण्याचा हा सोहळा येथे घडू शकला. त्यांच्या कार्याचा कोकणातील प्रत्येक गावाने आदर्श घेण्याची गरज असून 'नानायात्रा' ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन नामवंत कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी किर्लोस येथे केले.
ज्येष्ठ संगीत अभ्यासक माधव गावकर यांनी असगणी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते नाना चव्हाण यांचे चरित्र लेखन शब्दबद्ध व संपादन केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते किर्लोस विजयालक्ष्मी सभागृहात झाले. मुंबई केळकर कॉलेजचे माजी विभाग प्रमुख तथा भाषा अभ्यासक प्रा.डॉ.प्रकाश परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मंचावर नाना चव्हाण यांचे सुपुत्र माजी विशेष न्यायदंडाधिकारी ऍड. सदानंद चव्हाण, या ग्रंथाचे संपादक माधव गावकर,गणेश बाक्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यालय प्रमुख नामदेव चव्हाण, मधु पवार, छोटू सावंत, असगणी सरपंच साक्षी नामदेव चव्हाण, प्रकाशिका स्नेहल चव्हाण, रामचंद्र सावंत, दिवाकर दळवी, अक्षय परब, महादेव चव्हाण, प्रकाश चव्हाण, मंदार चव्हाण, सुचिता तुळशीदास परब, बाळकृष्ण साटम, वैभव पारकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कवी कांडर यांनी अशा पद्धतीचे पुस्तक हे त्या विशिष्ट माणसाबद्दल तर असतेच पण ते त्या गावचा,तेथील समाजाचा, त्या काळातील रूढी परंपरा या सगळ्याचा इतिहास देखील असतो. नाना चव्हाण यांच्या या चरित्रामुळे असगणी गावचे असे चित्र आपल्याला वाचायला मिळते. पर्यायाने तळकोकणातील संपूर्ण खेडेगावाचे लोकजीवन तात्कालीन परिस्थितीत कसे होते हेही प्राथमिक स्वरूपात या चरित्रामुळे अनुभवास येते. हेच या लेखनाचे महत्त्वाचे मोल आहे असेही आग्रहाने सांगितले.
प्रा.परब म्हणाले, ऍड. सदानंद चव्हाण आणि मी मुंबईतील रूम पार्टनर.त्यामुळे त्यांचे वडील नाना यांची भेट झाली होती.जसे बोलायचे तसेच ते वागायचे. आज त्यांचे चरित्र प्रसिद्ध करून त्यांचं कर्तुत्व नव्या पिढीसमोर आणण्यात आले आहेच परंतु साठ वर्षांपूर्वी एका खेड्यातील माणूस फारसं शिक्षण नसतानाही गावात परिवर्तन करण्यासाठी झटू शकतो हा आदर्शही लोकांसमोर या ग्रंथामुळे पोहोचणार आहे.
माधव गावकर म्हणाले,नानांच्या नाना आठवणींचे हे लेखन आहे. हे लेखन मी करावं असे सदानंद चव्हाण यांना वाटले आणि त्यामुळे हे लेखन माझ्या हातून घडू शकले. नानांच्या आठवणींच्या भावनांचा पिसारा मोठा आहे.त्यामुळेच जशा आठवणी आहेत तशाच त्या शब्दबद्ध केल्या गेल्या आहेत. यावेळी ऍड.सदानंद चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
यावेळी बाळ तावडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा "जीवन गौरव" पुरस्कार पांडुरंग धोंडू उर्फ मधु पवार यांना तर नाना चव्हाण यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा "समाजभूषण"पुरस्कार प्रकाश विठ्ठल उर्फ छोटू सावंत यांना प्रदान करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा