सिंधुदुर्ग Today न्यूज
'नाना यात्रा' ग्रंथाचे ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत १७ रोजी प्रकाशन
किर्लोस विजयालक्ष्मी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली/प्रतिनिधी
असगणी गावचे सामाजिक कार्यकर्ते गोविंद उर्फ नाना चव्हाण यांच्यावरील चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 17 मे रोजी स. १०.३० वा. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राजवळील विजयालक्ष्मी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रकाशन समारंभात 'नाना यात्रा' ग्रंथाचे प्रकाशन कवी अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक तथा गोविंद चव्हाण यांचे चिरंजीव सेवानिवृत्त विशेष न्यायदंडाधिकारी ऍड.सदानंद चव्हाण यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते गोविंद चव्हाण यांचे चिरंजीव सेवानिवृत्त विशेष न्यायदंडाधिकारी ऍड.सदानंद चव्हाण यांच्या संकल्पनेतून गोविंद चव्हाण यांचे सदर चरित्र लिहिले गेले असून त्याचे लेखन व संपादन ज्येष्ठ संगीत अभ्यास माधव गावकर यांनी केले आहे. आपल्या मनोगतात श्री गावकर म्हणतात नानांच्या नाना आठवणींचे हे लेखन आहे. हे लेखन मी करावं असे सदानंद चव्हाण यांना वाटले आणि त्यामुळे हे लेखन माझ्या हातून घडू शकले. नानांच्या आठवणींच्या भावनांचा पिसारा मोठा आहे.त्यामुळेच जशा आठवणी आहेत तशाच त्या शब्दबद्ध केल्या गेल्या आहेत.
कवी अजय कांडर यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली असून त्यात ते म्हणतात,खरं तर असगणी हे आम्हां कांडर कुटुंबाचे मूळ गाव. या गावातील एका कर्तबगार माणसाबद्दलचे हे पुस्तक माझ्याकडे येणे ही मी माझ्या मूळ गावाने मला घातलेली हाक आहे असं मानतो. माजी न्यायाधीश असलेल्या सदानंद चव्हाण ह्यांना आपल्या वडिलांची आठवण अशा रीतीने जागवावी वाटणे मला महत्त्वाचे वाटते.अशा पद्धतीचे पुस्तक हे त्या विशिष्ट माणसाबद्दल तर असतंच पण ते त्या गावाचा, तेथील समाजाचा, त्या काळातील रूढी, परंपरा, परस्पर संबंध या सगळ्याचा इतिहासदेखील असतो. नाना चव्हाण यांच्या या चरित्रामुळे असगणी गावाचे असे चित्र आपल्याला वाचायला मिळतेच. पर्यायाने तळकोकणातील संपूर्ण खेडेगावाचे लोकजीवन तत्कालीन परिस्थितीत कसे होते हेही प्रातिनिधिक स्वरुपात या चरित्रामुळे अनुभवास येते. हेच या लेखनाच महत्वाचं मोल आहे.
तरी या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सेवानिवृत्त विशेष न्यायदंडाधिकारी ऍड.सदानंद चव्हाण यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा