सिंधुदुर्ग Today न्यूज
बाबासाहेबांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नका
आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानात कवयित्री प्रमिता तांबे यांचे आवाहन
कणकवली/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नये. महाडचा 'चवदार तळ्याचा' लढा आणि 'मनुस्मृती दहन' त्यांनी शिवरायांचे स्मरण करतच केले.आज महामानव जातीत वाटले गेले आहेत. हे दुर्दैवी असून आपापल्या जातीची अस्मिता नको तेवढी टोकदार बनवली की त्याचा फायदा जातीय आणि धर्मांध लोक घेत समाजात दुफळी माजवत असतात. त्यामुळे बाबासाहेबांसारख्या सर्व समाजासाठी कार्य करणाऱ्या महापुरुषाचे विचार-कार्य समजून घेणे आणि त्याचे अनुकरण करणे म्हणजेच बाबासाहेबांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणे होय!यासाठी बाबासाहेबांचे भक्त न बनता अनुयायी बनुया असे आवाहन कवयित्री प्रमिता तांबे यांनी हरकुळ बुद्रुक येथे आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती सोहळा हरकुळ बुद्रुक येथे विविध कार्यक्रमातून साजरा झाला. यावेळी कवयित्री तांबे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर विकास मंचाचे अध्यक्ष एम् बी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, माजी सभापती बाबासाहेब वर्देकर, नित्यानंद चिंदरकर, डॉ.सुहास पावसकर आदी उपस्थित होते.
कवयित्री तांबे म्हणाल्या की, अलिकडच्या काळात महामानव जातीत वाटले गेले आहेत.पण बाबासाहेब फक्त दलितांचे नाहीत तर सर्वव्यापी होते हे समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याची सखोल माहिती समजून घ्यायला हवी. बाबासाहेब तीन आदर्शांना आपले गुरू मानत. हे तिन्ही आदर्श महामानव वेगवेगळ्या जातींचे होते.पण बाबासाहेबांनी जात न पाहता त्यांचे विचार आणि आदर्श पाहिले.जोतिराव फुले यांचे ब्राह्मण महिलांसाठीचे योगदान मोठे आहे. त्यांच्या शाळेतील पहिल्या ५ ही मुली ब्राह्मण होत्या. मात्र आतापर्यंत कोणत्याही ब्राह्मण वाड्यात जोतिरावांची जयंती साजरी होत नाही. फक्त बौद्ध समाज आणि माळी समाज वगळता इतर महिला म.फुलेंचे नाव काढत नाहीत. बाबासाहेबांनी
रायगड, रत्नागिरीत खोती आंदोलन केले. शेतकऱ्यांचा पहिला संप बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणला म्हणूनच त्यावेळचे शेतकऱ्यांचे नेते नारायण नागू पाटील म्हणजेच आताचे आमदार जयंत पाटील यांचे आजोबा यांनी त्यावेळी बाबासाहेबांना 'शेतकऱ्यांचा नेता' असे म्हटले होते.आसाममधील चहा मळ्यातल्या कामगारांसाठीचे आंदोलन असो की भाक्रा नांगल धरण, दामोदर खोरे प्रकल्प यासारखे जलविद्युत प्रकल्प असो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब नेहमीच आग्रही राहिले. पश्चिम बंगाल मधील खाणकामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले. त्याचवेळी कामाचे तास१२ वरून ८ वर आणले.तासाच्या कामाच्या तासांची आठ तासात रूपांतर. महिलांसाठी प्रसूती रजा मंजूर केली. वारसा हक्क , समान काम समान मजुरी या देणग्या बाबासखहेबांमुळेच मिळाल्या आहेत. हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होत नाही म्हणून राजीनामा देणारे बाबासाहेबच आहेत. मनुस्मृतीचे दहन, भारतीय संविधानात सर्व मागासवर्गांसाठी आरक्षण, शिक्षणा वस्तिगृहांची उभारणी, मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज यांसारख्या कॉलेजची स्थापना, मुकनायक सारखे वर्तमान पत्र काढून त्यामधून समाजव्यवस्थेवर घणाघात यासारख्या सामाजिक कार्यातून ते महामानव ठरले असे महत्वाचे विचार प्रमिता तांबे यांनी मांडले. शिवाय फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवराय यांना वेगवेगळे करू नका ते सर्व सोबतच आहेत हे विविध उदाहरणांतून पटवून दिले.
सकाळी ९.०० वाजता अध्यक्ष एम् बी तांबे यांच्या हस्ते झालेल्या पंचशील ध्वजारोहणाने सुरू झालेल्या या जयंती उत्सवात बौद्धवाडी ते ग्रामपंचायत दरम्यान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामपंचायतीला संविधान प्रास्ताविक असलेला फोटो भेट देण्यात आला. त्यानंतर पूजापाठ, विद्यार्थ्यांची भाषणे, आणि मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. या संपूर्ण जयंती उत्सवासाठी ल. गो. सामंत विद्यालयाचे नेवाळकर सर, आर. वाय. पाटील सर, सुमन तांबे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य घाडीगावकर, आनंद धामापूरकर, व्हि. एल. तांबे, वीरेंद्र धामणकर, सुधीर धामणकर, प्रवीण तांबे इत्यादी उपस्थित होते. अभिवादन सभेचे प्रास्ताविक विकास मंचाचे सचिव प्रवीण तांबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर धामणकर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा